बँकेला ७७ लाखांचा गंडा
By Admin | Updated: October 15, 2016 03:05 IST2016-10-15T03:05:28+5:302016-10-15T03:05:28+5:30
बँकेकडे तारण ठेवलेली दाल मिलची जागा सरकारी यंत्रणेला (एनएचएआय) अधिग्रहित करण्यास देऊन एका

बँकेला ७७ लाखांचा गंडा
तारण असलेल्या जागेचे अधिग्रहण : सरकारी यंत्रणेकडून मोबदलाही घेतला
नागपूर : बँकेकडे तारण ठेवलेली दाल मिलची जागा सरकारी यंत्रणेला (एनएचएआय) अधिग्रहित करण्यास देऊन एका व्यापाऱ्याने सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या इतवारी शाखेला ७७ लाखांचा गंडा घातला. हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर बँकेने अंबे दाल मिल (तेली समाज भवनजवळ, धान्य बाजार, नागपूर) च्या संचालकाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदवली. आंद्रेश कुमार असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी कळविले आहे.
तहसील पोलिसांच्या माहितीनुसार, आंद्रेशकुमारने २०१३ ते २०१६ या कालावधीत ही फसवणूक केली. त्याच्या दाल मिलच्या जागेची कागदपत्रे बँकेकडे तारण ठेवून आंद्र्रेशकुमारने ७७ लाखांचे कर्ज उचलले. दरम्यान ही जागा सरकारतर्फे एनएचएआयने अधिग्रहित केली. त्याचा मोबदला म्हणून आंद्रेशकुमारला ३६ लाख, ३३ हजार, ४७५ रुपये सरकारी यंत्रणेकडून मिळाले. मात्र, या रकमेतून बँकेचे कर्ज न फेडता आंद्रेशकुमारने स्वत:च ती रक्कम वापरली. एवढेच नव्हे तर त्याची साधी माहितीही बँकेला दिली नाही. कर्जाचे हप्ते थकल्याने बँक प्रशासनाने चौकशी केली असता फसवणूकीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे वरिष्ठ व्यवस्थापक शैलेंद्रकुमार श्रीनारायण दास (वय ३२) यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली.
तहसील पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक झाली की नाही, ते पोलिसांकडून स्पष्ट होऊ शकले नाही.(प्रतिनिधी)