सिकलसेलच्या ७६ टक्के
By Admin | Updated: October 24, 2016 02:54 IST2016-10-24T02:54:58+5:302016-10-24T02:54:58+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील माडिया गोंड समाजातील सिकलसेलच्या ७६ टक्के रुग्णांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ची कमी असते.

सिकलसेलच्या ७६ टक्के
रुग्णांत ‘व्हिटॅमिन डी’ची कमी
संजना जयस्वाल यांच्या संशोधनातील निष्कर्ष
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील माडिया गोंड समाजातील सिकलसेलच्या ७६ टक्के रुग्णांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ची कमी असते. यात ६३ टक्के मुली तर ३७ टक्के मुलांची संख्या असल्याचा निष्कर्ष मेयोच्या एमबीबीएस अंतिम वर्षाची विद्यार्थिनी संजना संजय जयस्वाल हिने काढला आहे. यासंदर्भातील संशोधन अकॅडमी फॉर सिकलसेल अॅण्ड थॅलेसिमियाच्या १० व्या वर्धापना दिनाच्या दरम्यान रॉयल कॉलेज आॅफ फिजिशियन लंडन येथे सादर करण्यात आले. २७ देशांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. यात महाराष्ट्रातून संजना ही एकमात्र विद्यार्थिनी ठरली, जिचा उत्कृष्ट १५मध्ये समावेश करण्यात आला.
विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यात सिकलसेल रुग्णांवरील अभ्यासासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने संजना हिने गडचिरोली जिल्ह्यात राहून संबंधित विषयावर शोध केला. त्यांनी रुग्णांमधील व्हिटॅमिन डीच्या अभ्यासासाठी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या. राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेच्या संचालकपदी नुकतेच रुजू झालेले डॉ. संजय जयस्वाल यांची मुलगी संजना हिने शोधामध्ये ५ ते १८ वयोगटातील सिकलसेलबाधित २१० रुग्णांचा अभ्यास केला. या अभ्यासातून लंडन येथे सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधाला घेऊन वरिष्ठ चिकित्सकांनी यात आणखी संशोधनाचा सल्ला दिला. डिसेंबर महिन्यात अकॅडमीच्यावतीने आवश्यक सूचना प्राप्त होणार असून त्यानुसार संजना काम करेल, अशी माहिती डॉ. जयस्वाल यांनी दिली.
तिरंग्याच्या रंगात निबंध
भारताच्या ध्वजाच्या रंगात संजनाने हा शोध निबंध सादर केला. संजना म्हणाली, भारताकडून हा शोधनिबंध सादर करणे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. म्हणूनच हा निबंध देशाच्या ध्वजाच्या रंगात तयार केला. २७ देशाच्या प्रतिनिधींमधून केवळ १५ प्रतिनिधींचे शोध निबंध सादर करण्यात आले. त्यात हा सन्मान मिळाला.