मोबाईल शॉपी मालकाचे ७.५२ लाख सायबर गुन्हेगाराने हडपले
By दयानंद पाईकराव | Updated: April 14, 2024 20:22 IST2024-04-14T20:20:55+5:302024-04-14T20:22:40+5:30
सहा खात्यातील रक्कम केली वळती

मोबाईल शॉपी मालकाचे ७.५२ लाख सायबर गुन्हेगाराने हडपले
नागपूर : मोबाईल शॉपीच्या मालकाचे वेगवेगळ्या खात्यातील ७ लाख ५२ हजार रुपये सायबर गुन्हेगाराने परस्पर वळते केल्याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिवरीनगर प्लॉट नं. ७७ येथे राहणाऱ्या फिर्यादीचे हनुमान गल्ली सीताबर्डीत मोबाईल खरेदी-विक्रीचे दुकान आहे. त्यांचे सीए रोडवरील इंड्सइंड बँकेत खाते असून त्यांचा मोबाईल क्रमांक त्या खात्याशी लिंक आहे. फिर्यादी दुकानदार ३० मार्च ते ३१ मार्च दरम्यान आपल्या घरी असताना त्यांना आपल्या वेगवेगळ्या खात्यातील ७ लाख ५२ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर झाल्याचे मॅसेज आले. त्यांनी हे पैसे कुणालाही पाठविले नसल्यामुळे बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यातून रक्कम ट्रान्सफर झाल्याचे समजले. अज्ञात आरोपीने त्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम वळती करून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४२०, सहकलम ६६ (ड) आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.