आठवड्याभरात कोरोनाचे ७५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:09 IST2021-09-26T04:09:19+5:302021-09-26T04:09:19+5:30
नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मागील आठवड्यात ७४ रुग्ण व १ मृत्यू, ...

आठवड्याभरात कोरोनाचे ७५ रुग्ण
नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मागील आठवड्यात ७४ रुग्ण व १ मृत्यू, तर या आठवड्यात ७५ रुग्ण आढळून आले. दिलासादायक म्हणजे, एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. शनिवारी पुन्हा दैनंदिन रुग्णसंख्येचा दुहेरी आकडा दिसून आला. १३ नव्या रुग्णांची भर पडली.
नागपूर जिल्ह्यात पाऊस लांबल्याने व्हायरल, डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही. यातच कोरोनाच्या चढ-उतारामुळे सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या आठवड्यात २९ रुग्णांची नोंद होती. परंतु त्यानंतर त्यात वाढच होत गेली. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३५ रुग्ण व १ मृत्यू असताना दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होऊन ६४ वर पोहोचली. १२ ते १८ सप्टेंबरपर्यंत ७४ रुग्ण व १ मृत्यूची नोंद झाली, तर १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान ७५ रुग्ण आढळून आले. यात शहरातील ५४, ग्रामीणमधील ११, तर जिल्ह्याबाहेरील १० रुग्ण आहेत.
- शहरात ६, ग्रामीणमध्ये ३, जिल्ह्याबाहेरील ४ रुग्ण बाधित
मागील २५ दिवसांपासून रोज ४ ते ५ हजाराच्या घरात चाचण्या होत आहेत. शनिवारी जिल्ह्यात ४,६१२ चाचण्या झाल्या. यात शहरात ३,४७४ चाचण्यांमधून ६, ग्रामीणमधील १,१३८ चाचण्यांमधून ३, तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक, १८ रुग्ण बरे झाले. सध्या कोरोनाचे ८५ रुग्ण सक्रिय आहेत.
-आठवड्याची स्थिती
२२ ते २८ ऑगस्ट : २९ रुग्ण
२९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर : ३५ रुग्ण, १ मृत्यू
५ ते ११ सप्टेंबर : ६४ रुग्ण
१२ ते १८ सप्टेंबर : ७४ रुग्ण, १ मृत्यू
१९ ते २५ सप्टेंबर : ७५ रुग्ण
:: कोरोनाची शनिवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ४,६१२
शहर : ६ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ३ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,९३,२६३
ए. सक्रिय रुग्ण :८५
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८३,०५८
ए. मृत्यू : १०,१२०