७४ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 08:13 PM2019-08-03T20:13:22+5:302019-08-03T20:14:31+5:30

उमरेड परिसरातील ग्रामीण भागात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घालून महावितरणच्या वीजवाहिन्यांना लक्ष्य केले आहे. वर्षभराच्या कालावधीत चोरट्यांनी सुमारे ७४ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या लंपास केल्या आहेत. लंपास केलेल्या वीजवाहिन्यांची किंमत दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

74 kilometers electric wire stolen | ७४ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या लंपास 

७४ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या लंपास 

Next
ठळक मुद्देउमरेडमध्ये भुरट्या चोरांचा हैदोस : महावितरणला फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड परिसरातील ग्रामीण भागात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घालून महावितरणच्या वीजवाहिन्यांना लक्ष्य केले आहे. वर्षभराच्या कालावधीत चोरट्यांनी सुमारे ७४ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या लंपास केल्या आहेत. लंपास केलेल्या वीजवाहिन्यांची किंमत दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. परिणामी, परिसरात अखंडित वीजपुरवठा करण्यास महावितरण प्रशासनास अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची विनंती महावितरणकडून उमरेड पोलिसांना करण्यात आली आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वीजचोरांनी उमरेड शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागाकडे आपले लक्ष्य केंद्रित केले आहे. परिणामी, किन्हाळा, शिरपूर, मकरधोकडा, उकरवाही, हेटी, हातकवडा, पाहमी, चारगाव, कळमना, उदासा, सेलोटी, बोरादाखल, गौवसी, शेडेश्वर, ठोंबरा, कातगाव, गावसुत, बोर्डकला, वासी यासह एकूण २६ ठिकाणी चोरट्यांनी आपला कार्यभाग साधला आहे. महावितरणच्या उमरेड ग्रामीण शाखा कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या या गावात चोरट्यांनी मे-२०१८ पासून चालू वीजवाहिन्यांवरील वीजप्रवाह बंद करून अ‍ॅल्युमिनियमच्या वाहिन्या लंपास केल्या आहेत.
चालू वीजवाहिन्यांशी खेळणे हे जीवावर बेतू शकते, याची जाणीव असतानादेखील जीव धोक्यात घालून चोरटे आपला कार्यभाग साधत आहेत. चोरटे आपला कार्यभाग साधत असल्याने महावितरणला या भागात वीजपुरवठा करण्यास अडचणीचा सामना करावा लागतो आहे.
चोरट्यांनी वीजवाहिन्या लंपास केल्यावर पुन्हा नवीन साहित्याची जमवाजमव करण्यात वेळ जातो आणि परिणामी बराच काळ वीज ग्राहकांना अंधारात राहावे लागते. प्रसंगी वीज ग्राहकांचा रोषही स्थानिक कर्मचाऱ्यांना पत्करावा लागतो.
या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, या मागणीचे निवेदन महावितरणच्या उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे यांनी उमरेड पोलिसांना दिले आहे. दीड कोटी रुपयांची वीजवाहिनी चोरीला गेल्याने महावितरणला या भागात नवीन वीजवाहिनी टाकण्यासाठी पुन्हा तेवढ्याच किमतीची नवीन वीजवाहिनी टाकावी लागली आहे.
उमरेड ग्रामीण भागातील निर्जनस्थळी वीजवाहिनीजवळ संशयास्पद हालचाली आढळून आल्यास, नागरिकांनी जवळच्या महावितरण कार्यालय किंवा पोलीस स्थानकास माहिती देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Web Title: 74 kilometers electric wire stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.