७२ टक्के मतदारांना हवे ‘बॅलेट’ने मतदान
By Admin | Updated: March 5, 2017 01:52 IST2017-03-05T01:52:55+5:302017-03-05T01:52:55+5:30
महाराष्ट्रात नुकत्याच महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांच्या ...

७२ टक्के मतदारांना हवे ‘बॅलेट’ने मतदान
तिरपुडे महाविद्यालयाचे सर्वेंक्षण : २० टक्के इव्हीएमच्या बाजूने
नागपूर : महाराष्ट्रात नुकत्याच महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांच्या निकालानंतर पराजित उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशीन (इव्हीएम)वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे जनमानसातही इव्हीएमच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या धक्कादायक सर्व्हेनुसार ७२ टक्के नागपूरकरांनी इव्हीएमऐवजी बॅलेट पेपर पद्धतीने मतदानाला पसंती दिली असून केवळ २० टक्के नागरिकांनी इव्हीएमला अनुकूलता दर्शविली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर विजेत्या पक्षाच्या उमेदवारांना वगळता इतर सर्व पक्ष व पराभूत उमेदवारांनी इव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप करीत असंतोष व्यक्त होत आहे. यामुळे नागरिकांमध्येही संभ्रम पसरला आहे. ही बाब लक्षात घेता तिरपुडे इन्स्टिट्यूट आॅफ सोशल अॅक्शन अँड रिसर्च या शिक्षण संस्थेने सर्व्हे करून नागपूरकरांचे जनमत जाणण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या स्वयंसेवकांनी उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम व मध्य क्षेत्रात १२९५५ मतदारांचे मत यामध्ये नोंदविले आहे. संस्थेने या सर्व्हेमध्ये इव्हीएम आणि बॅलेट पेपर यापैकी कोणती मतदान प्रणाली उपयुक्त आहे, हा प्रश्न मतदारांना विचारला.
१२९५५ पैकी तब्बल ९३७४ मतदारांनी इव्हीएमऐवजी बॅलेट पेपरने मतदान राबविण्याला पसंती दिली आहे. केवळ २६७८ मतदारांनी इव्हीएमद्वारे मतदान करण्याला प्राधान्य दिले आहे. सर्व्हेमध्ये ९०३ मतदारांनी कुठलेही मत व्यक्त करण्यास असमर्थता व्यक्त केली. याचा अर्थ सर्व्हेनुसार ७२.३६ टक्के नागरिकांनी इव्हीएमद्वारे मतदानाला नकार देत बॅलेटद्वारे मतदानाला पसंती दिली आहे. केवळ २०.६७ नागरिकांनी इव्हीएमला पसंती दिली आहे. ६.९७ टक्के मतदारांनी तटस्थता दर्शविली.