पोल्ट्रीतील ७ ते ८ कोटींची दैनिक उलाढाल संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 11:12 AM2021-01-12T11:12:16+5:302021-01-12T11:12:35+5:30

Nagpur News बर्ड फ्लूची चर्चा सुरू झाल्याने विदर्भात या व्यवसायातील ७ ते ८ कोटी रुपयांची दैनिक उलाढाल संकटात सापडली आहे.

7 to 8 crore daily turnover in poultry in crisis | पोल्ट्रीतील ७ ते ८ कोटींची दैनिक उलाढाल संकटात

पोल्ट्रीतील ७ ते ८ कोटींची दैनिक उलाढाल संकटात

Next
ठळक मुद्देव्यवसाय कोरोनानंतर आता पुन्हा बर्ड फ्लूच्या चर्चेने हादरला


गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बर्ड फ्लूच्या चर्चेमुळे विदर्भातील पोल्ट्रीचा व्यवसाय पुन्हा एकदा हादरला आहे. कोरोनाच्या काळात पूर्णत: कोलमडलेला हा व्यवसाय आता कुठे जेमतेम तग धरायला लागला होता; मात्र पुन्हा बर्ड फ्लूची चर्चा सुरू झाल्याने विदर्भात या व्यवसायातील ७ ते ८ कोटी रुपयांची दैनिक उलाढाल संकटात सापडली आहे.

राज्य शासनाने बर्ड फ्लूसंदर्भात हाय अलर्ट दिला असला तरी अद्याप कुठेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. कावळे, पोपट मृत आढळत असल्याने जनमानसात ही चर्चा वेगाने पसरली आहे. दहशतीपोटी त्याचा परिणाम थेट पोल्ट्रीच्या व्यवसायावर होऊ पहात आहे. परिणामत: ९० रुपये किलो दराचे बॉयलर आता ६० रुपयांवर घसरले आहे.

कोरोनाच्या काळात प्रारंभी कोंबड्यांपासून आजार होतो, अशी अफवा पसरल्याने रात्रीतून हा व्यवसाय कोसळला. कोंबड्यांची वाहतूक, विक्री सारेच ठप्प झाल्याने पोल्ट्रीचालक आर्थिक संकटात सापडले. नंतर अनेकांनी प्रोटीन्स वाढविण्यावर भर दिला गेल्याने कोलमडलेला हा व्यवसाय पुन्हा सुरू झाला. आता पुन्हा बर्ड फ्लूची चर्चा सुरू झाल्याने सर्वांचे लक्ष पोल्ट्रीकडे वळले आहे. अवघ्या चार महिन्यात हे दुसरे संकट उभे झाले आहे.

विदर्भात ७० ते ८० लाख कोंबड्या

विदर्भात लहान-मोठे मिळून ६०० ते ७०० पोल्ट्री व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे ७० ते ८० लाख कोंबड्यांची क्षमता आहे. येथील दैनिक उलाढाल ७ ते ८ कोटी रुपयांची आहे. तर अंड्यांचे दैनिक उत्पादन १० ते १२ लाखांचे आहे. ठोक दराने अंड्यांची किंमत ३.५० असून बॉयलरचा दर ९० रुपयांवरून आता ६० रुपये झाला आहे.

अशी आहे उलाढाल

कोंबड्यांचा दैनिक आहार १७० ग्रॅम असतो. त्यांचे खाद्य ३० रुपये प्रतिकिलो दराने मिळते. पूर्ण वाढ झालेल्या कोंबड्या विक्री न करता ठेवणे म्हणजे पोल्ट्रीचालकाचा खर्च वाढविणे असते. वाहतूक करून अंडी आणि कोंबड्यांची तातडीने विक्री करावी लागते. हा शेतीपूरक व्यवसाय असल्याने सोयाबीन, गहू, मका असे खाद्य कोंबड्यांच्या फिडींगसाठी लागते. व्यवसायावर गदा आल्यास फिडींगची धान्य खरेदी थांबण्याचा धोका आहे.

राज्यात कुठेच कोंबड्यांचे मृत्यू नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अवास्तव भीती बाळगू नये. शासनानेदेखील नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी. कोरोनानंतर कसाबसा स्वबळावर हा व्यवसाय उभा झाला आहे. पुन्हा तो कोलमडला तर व्यावसायिकांवर आत्महत्येची पाळी येईल.

- डॉ. राजा दुधबळे, अध्यक्ष, विदर्भ पोल्ट्री असोसिएशन

...

Web Title: 7 to 8 crore daily turnover in poultry in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.