राज्यात ६७८ पॉझिटिव्ह रुग्ण
By Admin | Updated: February 20, 2015 02:19 IST2015-02-20T02:19:23+5:302015-02-20T02:19:23+5:30
राज्यात स्वाईन फ्लूचे आतापर्यंत ६७८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजार नियंत्रणात आणण्यासाठी ...

राज्यात ६७८ पॉझिटिव्ह रुग्ण
नागपूर : राज्यात स्वाईन फ्लूचे आतापर्यंत ६७८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजार नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. विशेष म्हणजे, मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि नागपूरमधील स्वाईन फ्लू नमुन्याचे खासगी तपासणीचे शुल्क अर्ध्यावर आणण्याचा प्रयत्न आहे, सोबतच ५० पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या खासगी इस्पितळांमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्याचे व रुग्णाचे आर्थिक शोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी दिली. स्वाईन फ्लूवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर ते रविभवनात पत्रकारांशी बोलत होते.
जानेवारी ते आतापर्यंत राज्यात ९७ हजार २४८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात स्वाईन फ्लूचे ६ हजार ८८६ संशयित रुग्णांना टॅमी फ्लूचे औषध देण्यात आले. महाराष्ट्रात उपचार घेत असताना इतर राज्यातील नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. यात मध्य प्रदेशातील सहा, गुजरातमधील एक, आंध्र प्रदेशातील एक आणि उत्तर प्रदेशातील एक रुग्णांची नोंद आहे. राज्यात सध्याच्या घडीला २०५ रुग्ण भरती आहेत. यातील ४० रुग्णांची स्थिती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ११७ रुग्णांवर यशस्वी उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
विदर्भासह मध्य प्रदेशातील स्वाईन फ्लू संशयित रुग्णांच्या नमुन्याची तपासणी फक्त मेयोमध्येच होते, मात्र येथे रोज १३ च नमुने तपासले जातात. परिणामी, प्रलंबित नमुन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच खासगी प्रयोगशाळेत नमुन्याच्या तपासणीचे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे नाही. परिणामी स्वाईन फ्लू रुग्णांचा जीव धोक्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने १७ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी आज खासगीमध्ये तपासण्यात येणाऱ्या स्वाईन फ्लू चाचणीचे शुल्क कमी करण्याची व स्वाईन फ्लू तपासणीसाठी लागणारे पॉलिमर चेन रिअॅक्शन (पीसीआर) हे यंत्र लवकरच मेडिकलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती दिली.
राज्यात सर्वात जास्त मृत्यू नागपूर जिल्ह्यात
डॉ. सावंत यांनी सांगितले, राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूने ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील ४० टक्के मृत्यू एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. शहरात २२ तर ग्रामीण भागात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातच मध्य प्रदेशातील सहा रुग्णांचा नागपुरात मृत्यू झाला आहे. असा एकूण ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर विभागात चंद्रपूरमध्ये दोन, वर्धेत दोन आणि गोंदियात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्यमंत्र्यांची स्वाईन फ्लूच्या वॉर्डाकडे पाठ
नागपूरसह संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लूची साथ अजूनही नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. राज्यात सर्वात जास्त रुग्ण मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत मेडिकलमध्ये आले. बैठक घेतली. परंतु स्वाईन फ्लू वॉर्डाला भेट न देताच निघून गेले. यामुळे आरोग्य विभागाच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या खात्याकडून ते वॉर्डाची पाहणी करणार आहे, अशा सूचना मिळाल्या होत्या. त्या दृष्टीने तयारी करून ठेवण्यात आल्याची माहिती आहे.