दूषित पाण्याच्या ६,५०० तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:43 IST2017-07-21T02:43:36+5:302017-07-21T02:43:36+5:30
शहरालगतच्या भागातच नाही तर मध्यवर्ती भागातही दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या संदर्भात तक्रारी केल्यानंतरही याची दखल घेतली जात नाही.

दूषित पाण्याच्या ६,५०० तक्रारी
आरोग्य धोक्यात : अधिकारी -पदाधिकारी फोन उचलेनात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरालगतच्या भागातच नाही तर मध्यवर्ती भागातही दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या संदर्भात तक्रारी केल्यानंतरही याची दखल घेतली जात नाही. मागील काही महिन्यात दूषित पाण्याच्या तब्बल ६,५०० तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी देण्यात आली.
सीमावर्ती भागातील वस्त्यांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबतचा प्रश्न प्रफुल्ल गुडधे व रमेश पुणेकर यांनी उपस्थित केला होता. या संदर्भात तक्रार करण्यासाठी महापौर व पदाधिकाऱ्यांना फोन केला पण प्रतिसाद मिळत नाही. उपमहापौरांच्या प्रभाग २० मधील वस्त्यांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणले. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. विविध आजार होत असल्याचे विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी निदर्शनास आणले. दूषित पाण्याची तपासणी करण्यासाठी महापालिके ची यंत्रणा आहे का, यावर काय उपाययोजना करण्यात आल्या असा प्रश्न प्रफुल्ल गुडधे यांनी उपस्थित केला.
उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल यांनी निदर्शनास आणले. दूषित पाण्याची समस्या काही ठराविक वस्त्यात आहेत.तक्रारी असलेल्या भागाची कार्यकारी अभियंता यांनी पाहणी करण्याची सूचना सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी केली.
दूषित पाण्याच्या बहुसंख्य तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याची माहिती जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.गायकवाड यांनी दिली.