जिल्ह्यात पहिल्याच दिवशी ६५ टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:08 IST2021-01-17T04:08:31+5:302021-01-17T04:08:31+5:30
नागपूर : जगभरात हाहाकार उडविणाऱ्या कोरोनाचा संसर्गावर शनिवारपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत पहिल्याच दिवशी ६५.४८ टक्के लाभार्थ्यांना लस देण्यात ...

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी ६५ टक्के लसीकरण
नागपूर : जगभरात हाहाकार उडविणाऱ्या कोरोनाचा संसर्गावर शनिवारपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत पहिल्याच दिवशी ६५.४८ टक्के लाभार्थ्यांना लस देण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील १२ केंद्रांना ११८५ लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यातील ७७६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यात शहरातील २७० तर ग्रामीणमधील ५०६ लाभार्थ्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, सर्वाधिक लसीकरण काटोल केंद्रावर तर सर्वात कमी लसीकरण मेयो रुग्णालयातील केंद्रावर झाले.
नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शहरातील १० हजार तर ग्रामीणमधील ७ हजार ८०० असे एकूण १७ हजार ८०० लाभार्थ्यांना सिरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशिल्ड’ तर ५ हजार २०० लाभार्थ्यांना भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सीन’ लसीकरणाचा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील बाराही केंद्रावर पहिला डोज वरिष्ठ डॉक्टरांनी घेतला. त्यानंतर परिचारिका व कर्मचाऱ्यांना देण्यात आला. पाचपावली येथील स्त्री रुग्णालयात ८५ तर उर्वरित ११ केंद्रांना प्रत्येकी १०० लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष्य होते. त्यानुसार शहरातील पाचपावली केंद्रात ५९, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाच्या केंद्रावर ५३, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या केंद्रावर ६८, मेयो रुग्णालयाच्या केंद्रावर ३७ तर मेडिकलच्या केंद्रावर ५३ असे एकूण २७० लाभार्थ्यांना लस देण्यात आली. ग्रामीणमधील सात केंद्र मिळून ७०० पैकी ५०९ म्हणजे ७२.७१ टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. लस देण्यात आलेल्या एकूण ७७९ पैकी कुणालाच रिअॅक्शन किंवा आरोग्याच्या समस्या निर्माण झाली नाही.
-शहरात सर्वाधिक लसीकरण ‘एम्स’मध्ये
शहरातील ५ केंद्राच्या तुलनेत आज सर्वाधिक लसीकरण अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) केंद्रावर झाले. ६८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. लसीकरणाची सुरुवात एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांना लस देऊन करण्यात आली. यावेळी एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. लाभार्थ्यांमध्ये ४४ पुरुष व २४ महिला डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
-मेडिकलमध्ये ५३ लाभार्थ्यांना दिली लस
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) केंद्रावर डॉ. रीना रुपरॉय यांना लस देऊन लसीकरणाला सुरूवात झाली. यावेळी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, पीएसएम विभागाचे प्रमुख डॉ. उदय नारलावार, डॉ. सोनाली पाटील, डॉ. अभय चव्हाण, डॉ. मुरारी सिंग आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील इतर सर्व सेंटरवर कोव्हिशील्ड लस दिली जात असताना मेडिकलमध्ये कोव्हॅक्सीन लस दिली जात आहे. यामुळे की काय, आज ५३ लाभार्थी लस घेण्यासाठी पुढे आले. यात ३४ पुरुष व १९ महिला डॉक्टर व परिचारिकांचा समावेश होता.विशेष म्हणजे, कोव्हॅक्सीनचा डोस ५ हजार २०० लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. यासाठी आणखी पाच नवे लसीकरण केंद्र सुरू होणार असल्याची माहिती डॉ. नारलावार यांनी दिली.
-डागा रुग्णालयात ५३ लाभार्थ्यांनी घेतली लस
डागा स्मृती शासकीय महिला रुग्णालयातील केंद्रावर लसीकरणाची सुरुवात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संध्या डांगे यांना लस देऊन करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात प्रामुख्याने उपस्थित होत्या. या केंद्राकडे ४५२ लाभार्थ्यांना लस देण्याची जबाबदारी आहे. पहिल्या दिवशी १०० मधून ५३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यात २२ पुरुष व ३१ महिला डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
-मेयोमध्ये ३७ लाभार्थ्यांना दिली लस
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) केंद्रावर १०० मधून ३७ लाभार्थीच लसीकरणासाठी पुढे आले. यात १७ पुरुष तर २० महिलांचा समावेश होता. लसीकरणाची सुरुवात अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी लस घेऊन केली. यावेळी डॉ. रवी चव्हाण, डॉ. सागर पांडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
-पाचपावली सुतिका गृहात ५९ लार्भ्यांचा पुढाकार
महानगरपालिकेच्या पाचपावली सुतिका गृहात ५९ लाभार्थ्यांनी पुढाकार घेत लस घेतली. पालकमंत्री नितीन राऊत यांनी यांनी जिल्हातील लसीकरणाला सुरूवात केली. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित होते. १० पुरुष व ४९ डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
-ग्रामीणमध्ये लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर ग्रामीणमधील सात केंद्रावरील लसीकरण मोहिमेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात सुरूवात झाली. शहराच्या तुलनेत ग्रामीण केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात सावेनर केंद्रावर ६८, काटोल केंद्रावर सर्वाधिक ७८, हिंगणा केंद्रावर ७६, उमरेड केंद्रावर ६२, रामटेक केंद्रावर ७६, कामठी केंद्रावर ७३ तर गोंडखैरी केंद्रावर ७३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
-लसीकरणामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची आघाडी
शहरातील पाच केंद्रावर पहिल्या दिवशी झालेल्या लसीकरणामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची आघाडी राहिली. २७० लाभार्थ्यांमध्ये १२७ पुरुष तर १४३ महिलांनी लस घेतली.
-को-विन अॅपचा उडाला बोजवारा
लसीकरण करण्यात येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांची नोंद ‘को-विन अॅप’वर करण्यात आली. याच अॅपवरून लसीकरणाची तारीख व वेळेचे मॅसेज गेले. लस दिल्यानंतर या अॅपवर लाभार्थ्यांचे नाव डाऊनलोड करायचे होते. परंतु जिल्ह्यातील १२ केंद्रावर या अॅपचा बोजवारा उडाला होता. कधी सुरू तर कधी बंद पडत होते.
-दुपारनंतर सर्वच केंद्रावर शुकशुकाट
सकाळी १०.३० वाजेपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातील सर्वच केंद्रावर उत्साह होता. परंतु दुपारनंतर शहरातील केंद्रावर हा उत्साह उतरला. सर्वच केंद्रावर शुकशुकाट पसरला होता.
-फोन करुन लाभार्थ्यांना बोलवावे लागले
शहरातील पाचही केंद्रावर ग्रामीणच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला. मेयो, मेडिकल व डागा रुग्णालयातील लाभार्थ्यांना फोन करुन बोलाविण्याची वेळ आली होती. यासाठी इन्टर्न डॉक्टरांवर ही जबाबदारी देण्यात आली. लस न घेणाऱ्यांमध्ये अनेकांनी बाहेरगावी असल्याचे कारण दिल्याचे समोर आले.
लाभार्थीलक्ष्य
शहरमध्ये २७० ४८५
ग्रामीणमध्ये ५०६ ७००
एकूण ७७६ ११८५