6.28 lakh passengers increased at Nagpur airport in eight months | आठ महिन्यात नागपूर विमानतळावर ६.२८ लाख प्रवासी वाढले
आठ महिन्यात नागपूर विमानतळावर ६.२८ लाख प्रवासी वाढले

ठळक मुद्देघरगुती व आंतरराष्ट्रीय प्रवासी : एकूण प्रवासी २८ लाख ४ हजार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या उद्योग आणि व्यवसायात मंदीचे वातावरण असतानाही हवाई वाहतूक व्यवसायात सुगीचे दिवस आहेत. मिहान इंडिया लिमिटेडकडून (एमआयएल) प्राप्त अहवालानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अन्य ठिकाणी जाणारे आणि येणाऱ्या प्रवाशांमध्ये जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात गेल्या वर्षीच्या याच महिन्यांच्या तुलनेत ६,२८,१४० प्रवाशांची वाढ झाली आहे.
नागपूर विमानतळावर यावर्षी हवाई प्रवाशांच्या वाहतुकीत वाढ झाली आहे. यामध्ये घरगुती, आंतरराष्ट्रीय आणि चार्टर्ड विमानांनी प्रवास करणाऱ्यांचा समावेश आहे. सन २०१९ मध्ये जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत २८ लाख ४ हजार ५७९ प्रवाशांनी तर गेल्या वर्षीच्या या महिन्यात २१ लाख ७६ हजार ४३९ प्रवाशांनी प्रवास केला होता. तुलनात्मरीत्या आकडेवारीनुसार यावर्षी ६ लाख २८ हजार १४० प्रवासी जास्त असल्याची माहिती मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक आणि मुख्य कार्यान्वयन अधिकारी विजय मुळेकर यांनी दिली. नागपूर विमानतळावर हवाई प्रवासी वाहतूक वाढल्यामुळे सन २०२५-२६ पर्यंत हे विमानतळावर देशात अग्रस्थानाच्या यादीत येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुळेकर म्हणाले, विमानतळावरून प्रवाशांची संख्या वाढली असून एमआयएलने योग्यरीत्या नियोजन केले. नागपूर विमानतळाच्या पायाभूत सुविधांचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. याकरिता निविदा प्रक्रिया पूर्णत्वास आल्या असून जीएमआर समूहाला निविदा मंजूर झाली आहे. कंपनीने १४.४९ टक्के शासनाला देण्याचे मंजूर केले आहे. १,६८५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विमानतळाचा विस्तार करण्यात येणार आहे. विस्तारीकरण प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास जीएमआर समूह विमानतळाचे आधुनिकीकरण आणि संचालन करणार आहे. तथापि, हवाई वाहतूक सेवेचे संचालन भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे करण्यात येणार आहे. विस्तारीकरणात नवीन टर्मिनल इमारत, धावपट्टी, अ‍ॅप्रॉन आणि अधिकाधिक प्रवासी व कॉर्गो सेवेसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे. याकरिता अतिरिक्त जागेचे अधिग्रहण करण्यात आले असून विमानतळाकडे एकूण १,००.२१ हेक्टर जागा उपलब्ध झाली आहे.

 

Web Title: 6.28 lakh passengers increased at Nagpur airport in eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.