६१ हजारांचा सुगंधित तंबाखू व सुपारी जप्त

By Admin | Updated: March 2, 2017 02:29 IST2017-03-02T02:29:11+5:302017-03-02T02:29:11+5:30

पानटपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने सुगंधित तंबाखूचा पुरवठा व विक्री होत असल्याचे आढळून

61 thousand smoked tobacco and betel nut seized | ६१ हजारांचा सुगंधित तंबाखू व सुपारी जप्त

६१ हजारांचा सुगंधित तंबाखू व सुपारी जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : २८ पानटपऱ्यांची तपासणी
नागपूर : पानटपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने सुगंधित तंबाखूचा पुरवठा व विक्री होत असल्याचे आढळून आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम राबवून २८ पानटपऱ्यांची तपासणी करून ६१ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केला. विभागाने रेशीमबाग, मानेवाडा, मेडिकल चौक, तुकडोजी पुतळा, छोटा ताजबाग, गड्डीगोदाम, जरीपटका आदी परिसरात तपासणी करून आठ पानटपऱ्यांवरून ६१ हजार ३९५ रुपये किमतीचा साठा ताब्यात घेतला. पानटपऱ्या विक्रेत्यांनी खर्रा व इतर प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा विक्रीसाठी साठविल्यामुळे जप्त करण्यात आला. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधित व स्वादिष्ट तंबाखू, सुगंधित सुपारी व खर्रा इत्यादी प्रतिबंधित पदार्थांची साठवण व विक्री होत असल्याचे आढळल्यास जनतेने अन्न व औषध प्रशासनास कळविल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले आहे.
राज्य शासनाने गुटखा, पान मसाला, सुगंधित व स्वादिष्ट तंबाखू, सुपारी व खर्रा या अन्न पदार्थांच्या उत्पादन, वितरण, वाहतूक, साठवणूक व विक्रीवर एक वर्षाकरिता प्रतिबंध घातला आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवून धाडी व जप्ती करण्यात येत आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.
लोकांमध्ये खर्रा खाण्याचे प्रमाण अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. खर्रा तयार करण्यासाठी चोरट्या मार्गाने तंबाखूचा पुरवठा होत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विभागाची कारवाई २८ फेब्रुवारीला दिवसभर सुरू होती. ही कारवाई सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त (अन्न) मोतीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शीतल देशपांडे, सीमा सूरकर, अभय देशपांडे, मनोज तिवारी, आनंद महाजन, प्रवीण उमप, विनोद धवड, ललित सोयाम, रविराज धाबर्डे, किरण गेडाम, गुलाबसिंग वसावे, अनंत चौधरी व अमितकुमार उपलप यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: 61 thousand smoked tobacco and betel nut seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.