जमीन मोबदल्यात हेक्टरी ६० हजार रुपये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:22 IST2021-02-20T04:22:41+5:302021-02-20T04:22:41+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ येथील बेंबळा सिंचन प्रकल्पासाठी संपादित जमिनीच्या दोन प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी ६० ...

जमीन मोबदल्यात हेक्टरी ६० हजार रुपये वाढ
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ येथील बेंबळा सिंचन प्रकल्पासाठी संपादित जमिनीच्या दोन प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार रुपये मोबदला वाढवून दिला. न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी हा निर्णय दिला.
या प्रकल्पाकरिता वसंत पांडे यांची ६.९१ हेक्टर, तर दत्तू काळे व इतरांची ६.५१ हेक्टर कोरडवाहू जमीन संपादित करण्यात आली आहे. ही जमीन मौजा पिंपळखुटा येथे आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांनी २२ सप्टेंबर २००५ रोजी अवॉर्ड जारी करून पांडे यांना हेक्टरी ६९ हजार १५७ रुपये तर, काळे व इतरांना हेक्टरी ७१ हजार ५७३ रुपये मोबदला दिला होता. त्यामुळे या शेतकऱ्यांनी मोबदला वाढवून मिळण्यासाठी सुरुवातीला दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला असता, मोबदला वाढवून १ लाख ५० हजार रुपये हेक्टर करण्यात आला होता; परंतु त्यावरही शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल करून २ लाख १० हजार रुपये हेक्टर मोबदला देण्याची मागणी केली. या न्यायालयाने आधी समान परिस्थितीच्या जमिनीला एवढा मोबदला मंजूर केल्याची माहितीही त्यांनी दिली. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला.