२४ तासात ४ अधिकाऱ्यांसह ६ पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST2021-03-14T04:09:51+5:302021-03-14T04:09:51+5:30

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - मरणासन्न अवस्थेत वृद्धाला वाऱ्यावर सोडून चार पोलिसांनी संवेदना बोथट झाल्याचा परिचय दिला ...

6 policemen including 4 officers suspended in 24 hours | २४ तासात ४ अधिकाऱ्यांसह ६ पोलीस निलंबित

२४ तासात ४ अधिकाऱ्यांसह ६ पोलीस निलंबित

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - मरणासन्न अवस्थेत वृद्धाला वाऱ्यावर सोडून चार पोलिसांनी संवेदना बोथट झाल्याचा परिचय दिला तर, पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून एकाने जीव दिला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरवून कारवाईचा फास गळ्यात अडकविण्याची धमकी देऊन दोन पोलीस अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्याला जीव देण्यास बाध्य केले. तिसऱ्या एका प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याने महिलेच्या अब्रूशी खेळल्यानंतर तिला वाऱ्यावर सोडले. विशेष म्हणजे, केवळ २४ तासात या तिन्ही गंभीर प्रकरणाचा बोभाटा झाला अन् पोलीस दलाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. परिणामी संतप्त झालेल्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणातील एक पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि तीन कर्मचाऱ्यांवर कारवाईचा आसूड ओढला. नागपूर पोलीस दलाला हादरवून सोडणाऱ्या या तिन्ही प्रकरणाने राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली.

‘सद्‌रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन मिरवणाऱ्या पोलीस दलात अनेक चांगले आणि काही वाईट अधिकारी, कर्मचारी आहेत. अत्यल्प संख्येतील वाईट पोलीस नेहमीच चांगल्या पोलिसांची नव्हे तर संपूर्ण पोलीस दलाचीच मान लाजेने खाली जाते. वेळोवेळी त्याची प्रचिती येते. मात्र, त्यात घटना आणि स्थळांमध्ये अंतर असल्याने बरेचदा त्या घटना केवळ त्या भागापुरत्याच चर्चेला येतात.

नागपुरातील घटना मात्र राज्यभर चर्चेला आल्या आहेत.

पहिल्या घटनेतील दोषी मुख्यालयाचा हवालदार संजय पांडे तसेच मानकापूर ठाण्यातील बीट मार्शल रोशन यादव, राहुल बोटरे आणि उपनिरीक्षक लाकडे हे आहेत. त्यांच्या निष्क्रिय तसेच संवेदनाहीनतेमुळे भय्यालाल बैस हा वृद्ध सकाळपासून सायंकाळपर्यंत मरणासन्न अवस्थेत होता. शेवटी तो गतप्राण झाला. पांडे, यादव, बोटरे अन् लाकडेंच्या दुर्लक्षामुळे बैस यांचा जीव घेणारे गुन्हेगार अद्याप अंधारात आहेत.

दुसरा गुन्हा ठाणे पोलीस आयुक्तालयात दाखल आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या ब्लॅकमेलर बायकोला हाताशी धरून यशोधरानगर पोलीस ठाण्यातील गोरेगावच्या सचिन साबळेंकडून साडेसहा लाखांची खंडणी उकळली अन् त्यांना एवढे टॉर्चर केले की साबळेंनी स्वत:च गळ्यात फास अडकवून ब्लॅकमेलर पोलीस तसेच निता मानकर नामक बयेच्या त्रासातून आपली सुटका करून घेतली. या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण आणि तत्कालीन ठाणेदार रमाकांत दुर्गे हे दोघे पैशासाठी कसे माणुसकी सोडून वागले, ते उघड झाले.

तिसऱ्या घटनेतील पोलीस निरीक्षक अरविंद भोळे याने स्वत:सोबत पोलीस दलाचीही अब्रू उघड्यावर आणली. स्त्रीलंपट असलेल्या भोळेने अनेक भाबड्या महिलांचे शोषण केले आहे. आता त्याने एका विधवेचे शोषण करून तिला वाऱ्यावर सोडले. त्यामुळे महिलेने भोळेचे कपडे फाडण्यासाठी प्रसारमाध्यमाकडे धाव घेतली. हे तिन्ही प्रकरण पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे आहेत. गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे टास्क स्वीकारण्याऐवजी हे पोलीसच समाजकंटकांसारखे वागत असल्याचे पाहून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या सातपैकी सहा जणांना गेल्या २४ तासात दणका देत निलंबित केले. दुर्गेची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर कोणती कारवाई करावी, याबाबत विचारविमर्श केला जात आहे. विशेष म्हणजे, दुर्गेचा साथीदार चव्हाण याने मेश्राम नामक नव्या ठाणेदाराच्या नावावरही तीन लाखांची खंडणी मागत त्यांनाही या प्रकरणात अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालविला आहे.

Web Title: 6 policemen including 4 officers suspended in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.