अमरावती विभागात ५,९७८ स्मार्टकार्डधारकप्रवासी
By Admin | Updated: May 14, 2014 00:12 IST2014-05-14T00:12:54+5:302014-05-14T00:12:54+5:30
शाळा, महाविद्यालये सुरू होताच ये-जा करण्यासाठी एसटीची पास मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांना रांगेत लागावे लागते. मात्र एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठीही स्मार्टकार्डची सुविधा उपलब्ध

अमरावती विभागात ५,९७८ स्मार्टकार्डधारकप्रवासी
जितेंद्र दखने - अमरावती शाळा, महाविद्यालये सुरू होताच ये-जा करण्यासाठी एसटीची पास मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांना रांगेत लागावे लागते. मात्र एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठीही स्मार्टकार्डची सुविधा उपलब्ध केल्याने त्यांची या सर्व त्रासातून सुटका होणार आहे. मासिक, त्रैमासिक, पासधारक आणि आवडेल तेथे प्रवास करणार्यांनाही पासऐवजी स्मार्टकार्ड मिळणार आहेत. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला मिळालेले स्मार्टकार्ड तीन वर्ष वापरता येणार आहे. आतापर्यंत राज्य परिवहन महामंडळाने ५,९७८ स्मार्ट कार्डचे वाटप केले आहे. महामंडळाच्या ८ आगारात सध्या इलेक्ट्रॉनिक तिकीट देण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी मशीन उपलब्ध आहेत. या मशिनद्वारेच स्मार्टकार्ड सुविधेचा लाभ घेता येईल. प्रत्येक स्मार्टकार्डला एक विशिष्ट सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. त्यामुळे पास फाटणे, फोटो नसणे आणि दर महिन्याला नवीन पास काढण्याची कसरत विद्यार्थ्यांना करावी लागणार नाही. यासोबतच अन्य एसटी प्रवाशांनाही स्मार्टकार्ड देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. नव्याने देण्यात आलेले एक आणि तीन महिन्याचे पास प्रवासी वापरु शकतात. वाहकालाही स्मार्टकार्ड वापरणे सोपे होणार आहे. त्यांच्याकडील मशिनमध्ये ते वापरण्याची व्यवस्था आहे. स्मार्टकार्ड पंचिंग करताच त्यातून ज्या ठिकाणी जायचे आहे त्या प्रवासाचे पैसे कमी होतील. आणि प्रवाशांना तिकीट देखील मिळेल. विद्यार्थी आपल्या गरजेनुसार कार्ड रिचार्ज करु शकतात. जेवढा प्रवास केला जाईल तेवढे कार्डवरील पैसे कमी होतील. ते संपल्यानंतर स्मार्टकार्ड रिचार्ज करता येईल. त्यासाठी पुन्हा नव्याने फॉर्म भरण्याची गरज नाही. ही प्रक्रिया गतिमान असल्यामुळे रांगेतही उभे राहण्याची गरज भासणार नाही. स्मार्टकार्ड आणि प्रक्रिया शुल्क म्हणून ३७ रुपये खर्च होणार आहे. प्रत्येकाच्या नावातील याद्यानुसार कार्डवर क्रमांक टाकण्यात येणार असून तीन ते सात दिवसांत कार्ड दिले जाईल. कायमस्वरुपी स्मार्टकार्डचा कालावधी ३ वर्षांचा असेल. अमरावती विभागात आतापर्यंत कमी कालावधीसाठी १ हजार ९९८ तर कायमस्वरुपी ३ हजार ९८0 स्मार्टकार्डचे वाटप करण्यात आले आहे.