दक्षिण नागपुरातील ५५ लेआऊटचे आरक्षण रद्द

By Admin | Updated: August 23, 2014 03:10 IST2014-08-23T03:10:30+5:302014-08-23T03:10:30+5:30

दक्षिण नागपुरातील अनेक लेआऊट विविध उपक्रमासाठी आरक्षित असल्याने, येथील नागरिक मूलभूत सोईसुविधेपासून वंचित होते.

55 leased reservations in South Nagpur canceled | दक्षिण नागपुरातील ५५ लेआऊटचे आरक्षण रद्द

दक्षिण नागपुरातील ५५ लेआऊटचे आरक्षण रद्द

नागपूर : दक्षिण नागपुरातील अनेक लेआऊट विविध उपक्रमासाठी आरक्षित असल्याने, येथील नागरिक मूलभूत सोईसुविधेपासून वंचित होते. लेआऊटचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भातील अनेक प्रकरणे प्रलंबित होती. मात्र नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. रवींद्र (छोटू) भोयर यांच्या अथक प्रयत्नामुळे नुकतेच दक्षिण नागपुरातील ५५ लेआऊटचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यासोबतच २१ लेआऊटची डिलीशन प्रक्रिया सुरू असल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले. उर्वरित लेआऊटचे आरक्षण रद्द करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
नागरिकांना रस्ते, उद्यान, प्ले ग्राऊंड आदींची सुविधा उपलब्ध करण्याचा उद्देशाने नासुप्रच्यावतीने विविध ठिकाणी जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. नासुप्रने या जागा वेळीच ताब्यात घेतल्या नाहीत. शिवाय सोयीसुविधा उभारल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी आहे त्या परिस्थितीत या जागेवर राहण्यास सुरुवात केली. जागा आरक्षित असल्याने नागरिकांना विविध लाभकारी योजनांपासून वंचित राहावे लागत होते. या लेआऊटचे आरक्षण रद्द करण्यात यावे, अशी मागणी मागील अनेक वर्षापासून करण्यात येत आहे.
शासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न अनेक वर्षापासून ‘जैसे थे’ होता. मात्र नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त म्हणून सतत पाठपुरावा केला व अखेर त्यांच्या लढ्याला यश आले, असे भोयर यांनी सांगितले.
सध्यस्थितीत ५५ लेआऊटचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. तसेच २१ लेआऊटची डिलीशन प्रक्रिया सुरू आहे. आता या लेआऊटमधील नागरिकांना विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले. आरक्षण रद्द झाल्याने याचा लाभ सुमारे दहा हजार कुटुंबांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 55 leased reservations in South Nagpur canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.