यावर्षीच्या अखेरपर्यंत धावणार ५५ इथेनॉल बस
By Admin | Updated: March 25, 2015 02:22 IST2015-03-25T02:22:22+5:302015-03-25T02:22:22+5:30
पायलट प्रकल्पांतर्गत शहरात धावत असलेल्या इथेनॉल बसचे सकारात्मक परिणाम दिसत आहे.

यावर्षीच्या अखेरपर्यंत धावणार ५५ इथेनॉल बस
नागपूर : पायलट प्रकल्पांतर्गत शहरात धावत असलेल्या इथेनॉल बसचे सकारात्मक परिणाम दिसत आहे. सप्टेंबरपर्यंत पाच नवीन बसेस आणि डिसेंबर अखेरीस ५० बसेस शहर बस सेवेत दाखल करण्याची स्वीडन येथील स्कॅनिया इंडिया कंपनीची तयारी आहे. एप्रिलच्या अखेरीस मनपासोबत अंतिम करार होण्याची शक्यता आहे.
ही बस सध्या रिझर्व्ह बँक ते खापरी या मार्गावर धावत आहे. प्रति लिटर १.६७ कि़मी. मायलेज आहे तर डिझेलवर धावणाऱ्या लक्झरी बसचे मायलेज २ ते २.५ कि़मी. एवढे आहे. इथेनॉलची किंमत ३१ रुपये प्रति लिटर आहे. यामुळे कार्बन डाय आॅक्साईडचे उत्सर्जन ९० टक्के कमी होते. ग्रीन सिटीनुसार ही बाब नागपूरसाठी सकारात्मक आहे. रिझर्व्ह बँक ते खापरी या मार्गावर ही बस दररोज आठ वेळ ये-जा करते आणि ३५० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात.
स्कॅनिया इंडियाचे संचालक (विक्री व विपणन) क्रिस्टर थुलिन यांनी सांगितले की, नागपुरातील रस्त्यांवर सर्व खर्च जोडल्यास कंपनीला ६१ रुपये प्रति कि.मी. एवढा खर्च येतो. ५५ बसेससाठी कंपनीला २० ते ३० हजार चौरस जागेची गरज आहे.
मनपासोबत चर्चा सुरू आहे. एका बसचे आयुष्य १५ वर्षे आहे. या तुलनेत अन्य बस ८ ते १० वर्ष सेवा देते. कंपनी इथेनॉलवर बस चालविणार असून देखरेखही करणार आहे. इथेनॉल बससंदर्भात काही नियम तयार होत आहेत. चर्चेदरम्यान स्कॅनिया कंपनीचे संचालक (विक्री) शिवकुमार व्ही. उपस्थित होते. (प्रतिनिधी)