वर्षाच्या अखेरच्या दिवशी तब्बल ५४३ रजिस्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:08 IST2021-01-02T04:08:13+5:302021-01-02T04:08:13+5:30

नागपूर : बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत देऊ केलेल्या ३ टक्के मुद्रांक शुल्क सवलतीचा फायदा ग्राहकांनी ...

543 registries on the last day of the year | वर्षाच्या अखेरच्या दिवशी तब्बल ५४३ रजिस्ट्री

वर्षाच्या अखेरच्या दिवशी तब्बल ५४३ रजिस्ट्री

नागपूर : बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत देऊ केलेल्या ३ टक्के मुद्रांक शुल्क सवलतीचा फायदा ग्राहकांनी घेतला. गुरुवारी सवलत मिळण्याची अखेरची तारीख असल्याने नागपूर शहरातील सर्व नऊ मुद्रांक नोंदणी कार्यालयात रजिस्ट्रीसाठी रात्री ८ वाजेपर्यंत गर्दी होती. अखेरच्या दिवशी ५४३ रजिस्ट्री झाल्या आणि त्यातून शासनाला ६ कोटी २३ लाख ५० हजार ६८० रुपयाचा महसूल मिळाला.

राज्य शासनाने घोषणा केल्यानुसार, १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत आणि १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ पर्यंत २ टक्के सवलत देण्याची अधिसूचना ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात काढली होती. त्यानुसार १ सप्टेंबरपासून सर्व मुद्रांक कार्यालयात रजिस्ट्रीत वाढ होऊ लागली, पण त्याप्रमाणात शासनाला महसूल कमी मिळू लागला. राज्य शासनाने घोषणेमुळे घराच्या विक्रीला वेग आला आणि बांधकाम क्षेत्रातील मरगळ दूर झाली. त्यामुळे जुने प्रकल्प पूर्ण करण्यास वेग आला. अनेकांनी नवीन प्रकल्पाचे उद्घाटनही केले आणि फ्लॅट विक्री करू लागले. यातच ३ टक्के मुद्रांक शुल्क सवलतीची मुदत ३१ मार्चपर्यंत देण्याची मागणी क्रेडाई महाराष्ट्र मेट्रोने राज्य शासनाकडे लावून धरली होती. ३१ डिसेंबरला ३ टक्के सवलतीची मुदत संपली असून, १ जानेवारीपासून ग्राहकांना मुद्रांक शुल्कात २ टक्के सवलत मिळणार आहे.

डिसेंबरमध्ये सुटीच्या दिवशीही कार्यालय खुले

डिसेंबरमध्ये रजिस्ट्रीचा वेग वाढताच मुद्रांक नोंदणी कार्यालयाने शनिवारी सुटीच्या दिवशीही कार्यालय खुले ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवार १२, १९ आणि २६ तारखेला कार्यालय खुले होते. ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये रजिस्ट्रीची संख्या वाढू लागताच कार्यालयातील सर्व्हरचा वेग मंदावला. त्यामुळे एका रजिस्ट्रीसाठी तीन ते चार दिवस लागले.

पूर्व मुद्रांक शुल्क खरेदीचा चार महिने मिळणार फायदा

सवलतीमुळे रजिस्ट्री करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढू लागताच ३१ डिसेंबरपूर्वी घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्क खरेदी करणाऱ्यांना तब्बल चार महिने मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत देण्याची घोषणा केली. त्यानुसार कोट्यवधी रुपयाच्या मुद्रांक शुल्काची ग्राहकांनी खरेदी केली. त्यामुळे त्यांना चार महिन्यापर्यंत ३ टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे.

३ टक्के मुद्रांक शुल्क सवलतीनंतर रजिस्ट्री

नोंदणी व मुद्रांक शुल्क (कोटीत)

महिना रजिस्ट्री मुद्रांक शुल्क

सप्टेंबर ६,५७१ ४०.७०

ऑक्टोबर ८,३४२ ६१.२७

नोव्हेंबर ८,३०० ५६.१८

३१ डिसें. ५४३ ६.२३

Web Title: 543 registries on the last day of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.