दीक्षाभूमीवर ५२ सीसीटीव्ही
By Admin | Updated: September 30, 2014 00:35 IST2014-09-30T00:35:59+5:302014-09-30T00:35:59+5:30
पवित्र दीक्षाभूमीवर ५८ व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीच्या धामधुमीच्या तोंडावर हा सोहळा होत असल्याने आंबेडकरी अनुयायांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दीक्षाभूमीवर ५२ सीसीटीव्ही
एच.डी. कॅमेऱ्याचे लक्ष : स्वयंचलित कॅमेरेही
नागपूर : पवित्र दीक्षाभूमीवर ५८ व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीच्या धामधुमीच्या तोंडावर हा सोहळा होत असल्याने आंबेडकरी अनुयायांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आनंदाच्या पर्वावर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी तयारी पूर्ण केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीनेही मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सीसीटीव्ही कॅमऱ्यांची संख्या वाढवली आहे. मागील वर्षी २६ कॅमेऱ्यांची नजर दीक्षाभूमीवर होती. या वर्षी ‘हाय डेफिनेशन’चे (एच.डी.) तब्बल ५२ कॅमेरे लावण्यात येत आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या पवित्र भूमीत आपल्या लाखो अनुयायांना बौध्द धम्माची दीक्षा दिली होती. त्याचे स्मरण म्हणून या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी नागपुरात येतात. या गर्दीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज आहे, त्यांच्यासेवेत हायटेक यंत्रणा देण्यात आली आहे. टेक्नॉकी सोलुशनचे संचालक संजय मंडल यांनी सांगितले, या वर्षी पहिल्यांदाच स्वयंचलित, स्पीड डोम कॅमेरे लावण्यात आले आहेत. ३६० डिग्रीमध्ये फिरणारा हा कॅमेरा दीक्षाभूमीच्या मुख्य कार्यक्रम स्थळी आणि प्रवेशद्वारावर लावण्यात येणार आहेत. हा मुव्हिंग कॅमेरा साधारण एक किलोमीटर अंतरावरील बारीकसारीक दृश्ये चित्रीत करतो. या दोन कॅमेराशिवाय अत्याधुनिक ३८ नाईट व्हिजन कॅमेरे लावण्यात येणार आहेत. हे कॅमेरे काळोखातील चित्र स्पष्ट दाखवितात, सोबतच हवे असलेले चित्र झूम करता येते. दीक्षाभूमीतील नऊ प्रवेशद्वारासोबतच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याच्या परिसरात, डोमच्या आत, बाहेर व कार्यक्रम स्थळाच्या परिसरात कॅमेरे लावण्याचे काम सुरू आहे. साधारण मंगळवारपासून हे सर्व कॅमेरे कार्यरत होतील. यांचे फुटेज पाहण्यासाठी तीन मोठे डिस्प्ले दीक्षाभूमीतीलच पोलीस कंट्रोल रुममध्ये राहतील. सतत २४ तास कॅमेरे सुरू ठेवण्यासाठी कंपनीचे कर्मचारी तैनात राहतील. याशिवाय हे सर्व कॅमरे व्हायफाईशी जोडण्यात येणार आहे. यामुळे कुठेही खंड पडणार नाही. या चाळीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच स्मारक समितीच्या १६ कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. एकूणच ५२ कॅमेरे या वर्षी प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींवर नजर ठेवून असणार आहे. (प्रतिनिधी)