नरखेड तालुक्यात ५१९४ घरकुल मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST2021-01-08T04:23:23+5:302021-01-08T04:23:23+5:30
नरखेड : महाआवास अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. नरखेड तालुक्यात ५१९४ घरकुलांना मंजुरी मिळाल्याची ...

नरखेड तालुक्यात ५१९४ घरकुल मंजूर
नरखेड : महाआवास अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. नरखेड तालुक्यात ५१९४ घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. तहसीलदार, गटविकास अधिकारी, पं. स. सभापती, उपसभापती यांच्याकडून याप्रसंगी योजना राबविताना येणाऱ्या अडचणींची माहिती प्रशासनाच्या वतीने जाणून घेण्यात आली. प्रत्येक लाभार्थ्यांची अडचण सोडवून त्याला घरकुलाचा लाभ देण्याचा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिकारी, पदाधिकाऱ्यांना दिल्या. ते कार्यशाळेत आभासी माध्यमाद्वारे सहभागी झाले होते. या कार्यशाळेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण करिता २०१६-१७ ते २०२०-२१ दरम्यान लक्षांक ६८७० घरकुलांचा होता. त्यापैकी ५१९४ घरकुलास मंजुरी मिळाली आहे. यातील ३३९० लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. २०२५ घरकुल पुर्ण झाले असून, ३१६९ घरकुलांचे काम अपूर्ण आहे. १८८१ लाभार्थ्यांकडे जागेची अडचण आहे. त्यातील ४७ लाभार्थी आर्थिक अडचणीमुळे बांधकाम करण्यास तयार नसल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. यावर सरपंच, सचिव यांनी तोडगा काढण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची मदत घ्यावी, असे ठरविण्यात आले आहे. तालुक्यात ४८४ अतिक्रमणधारक असून, राहत असलेली जागा त्यांना देण्याची कार्यवाही करण्याचे याप्रसंगी निश्चित करण्यात आले. रमाई आवास योजनेतील ११० लाभार्थ्यांना घरकुलाचे पैसे मिळाले नाही, यावरही याप्रसंगी चर्चा झाली. शबरी आवास योजनेअंतर्गत ६६ लाभार्थ्यांची घरे अपूर्ण आहेत, ती पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्याचे याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले. कार्यशाळेला तहसीलदार डी. जी. जाधव, खंडविकास अधिकारी प्रशांत मोहोड, जि. प. सदस्य सलील देशमुख, सभापती नीलिमा सतीश रेवतकर, उपसभापती वैभव दळवी, जि. प. सदस्या देवका बोडखे, पं. स. सदस्या सुभाष पाटील, महेंद्र गजबे, अरुणा मोवाडे ,रश्मी आरघोडे, सतीश रेवतकर, विवेक बालपांडे, पं. स.चे अधिकारी रामदास गुंजरकर, राजेंद्र धांडे, अतुल आदे, उत्तम बलवीर यांच्यासह तालुक्यातील सरपंच व सचिव उपस्थित होते.