मेडिकलमध्ये ५००वर ‘जॉर्इंट रिप्लेसमेंट’

By Admin | Updated: June 17, 2016 03:16 IST2016-06-17T03:16:55+5:302016-06-17T03:16:55+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अस्थिरोग विभागात १९९० पासून दोन हाडांना जोडणाऱ्या सांध्याचे प्रत्यारोपण (जॉर्इंट रिप्लेसमेंट) सुरू असून,

500 'Joint Replacement' in Medical | मेडिकलमध्ये ५००वर ‘जॉर्इंट रिप्लेसमेंट’

मेडिकलमध्ये ५००वर ‘जॉर्इंट रिप्लेसमेंट’

अस्थिरोग विभागाचे यश : सिकलसेलग्रस्तांमध्ये सांधे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वाधिक
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अस्थिरोग विभागात १९९० पासून दोन हाडांना जोडणाऱ्या सांध्याचे प्रत्यारोपण (जॉर्इंट रिप्लेसमेंट) सुरू असून, आतापर्यंत ५०० वर प्रत्यारोपण झाले आहे. विशेष म्हणजे, सिकलसेल रुग्णांमध्ये सर्वाधिक ‘हिप जॉर्इंट’ शस्त्रक्रिया करणारे हे राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे.
गुडघा प्रत्यारोपण (नी रिप्लेसमेंट) असो की मांडी व कटी यामधील सांधा बदलवून बसविण्याची (हिप रिप्लेसमेंट) शस्त्रक्रिया केवळ खासगी इस्पितळांमध्येच होतात, असा काहीसा गैरमसज आहे. परंतु मेडिकलच्या अस्थीरोग विभागात याच शस्त्रक्रिया २६ वर्षांपासून होत आहेत. विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांमुळे हे शक्य झाले आहे. या विभागाचे प्रमुख डॉ. सजल मित्रा यांनी सांगितले की, सुरुवातीला या शस्त्रक्रियांची संख्या कमी होती. मात्र, तंत्रज्ञानात झालेली प्रगती, चांगले परिणाम, वाढती कुवत यामुळे रुग्णांनी मेडिकलच्या डॉक्टरांवर विश्वास दाखवून ही संख्या सुमारे ५०० वर पोहोचली आहे. गुडघ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाताच्या, खुब्याच्या सांध्याच्या वाताचा व या सांध्याच्या जवळ होणारे गंभीर फ्रॅक्चर अशा रुग्णांना जॉर्इंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेमुळे वेदनेपासून चांगला आराम होत आहे. आलेल्या अपंगत्वाला दूर सारले जात आहे.
मेडिकलच्या या अस्थिरोग विभागाने २००८ मध्ये १०० जॉर्इंट रिप्लेसमेंट केलेल्या रुग्णांचे ‘वॉकेथॉन’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘हिप रिसरफेसिंग’ ही शस्त्रक्रिया राज्यात प्रथमच या विभागात २००४ मध्ये करण्यात आली. सध्या ‘नी जॉर्इंट रिप्लेसमेंट’ व ‘हिप रिप्लेसमेंट’मध्येही अत्याधुनिक प्रकारच्या शस्त्रक्रिया होत आहेत. गेल्या पाच वर्षांत अस्थिरोग विभागाच्या शस्त्रक्रिया विभागात पायाभूत सोयी व यंत्रसामुग्रीमध्येही काळानुरूप बदल करण्यात आलेले आहेत. या सोयी इतर खासगी रुग्णालयाच्या तुलनेने सारख्याच आहेत. ‘स्पेस सूट’, ‘कॉम्प्युटर नॅविगेशन’, अत्याधुनिक पॉवर यंत्रसामुग्री व ‘लॅमिनार एअर फ्लो’ अशा सोयी उपलब्ध आहेत. लवकरच होणाऱ्या ‘मॉड्युलर ओटी’चाही रुग्णांना लाभ मिळणार आहे. विभागाचे हे यश मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: 500 'Joint Replacement' in Medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.