‘सीआयसीआर’ संचालकावर ५० हजाराचा खर्च

By Admin | Updated: May 2, 2015 02:13 IST2015-05-02T02:13:18+5:302015-05-02T02:13:18+5:30

केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या मुंबई खंडपीठाने सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च (सीआयसीआर) नागपूरचे संचालकावर...

50 thousand rupees for 'CICR' operator | ‘सीआयसीआर’ संचालकावर ५० हजाराचा खर्च

‘सीआयसीआर’ संचालकावर ५० हजाराचा खर्च


नागपूर : केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या मुंबई खंडपीठाने सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च (सीआयसीआर) नागपूरचे संचालकावर अंतरिम आदेशाची अवमानना केल्यामुळे ५० हजार रुपयांचा खर्च बसविला आहे. ही रक्कम पीडित अर्जदाराला भरपाई म्हणून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नितीन झाडे असे अर्जदाराचे नाव आहे. ते सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च नागपूर येथे रिसर्च असोसिएटपदी कार्यरत होते. त्यांना पुढील आदेशापर्यंत पदावर कायम ठेवण्याचे अंतरिम आदेश लवादाने दिले होते. परंतु, संस्थेने लवादाची अनुमती न घेता ३० जून २०१२ पासून त्यांची सेवा संपुष्टात आणली. झाडे यांच्यासोबत इतर चौघांची सेवा संपुष्टात आणल्या गेली होती. इतरांना दुसऱ्या प्रकल्पात सामावून घेण्यात आले पण, झाडे यांना कुठेच नोकरी देण्यात आली नाही. ही बाब लक्षात घेता लवादाने संस्था संचालकावर ५० हजार रुपयांचा खर्च बसविण्यासोबतच झाडे यांना दुसऱ्या प्रकल्पात रिसर्च असोसिएटपदी नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहेत. ५० हजार रुपये जमा करण्यासाठी येत्या ५ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्चने एप्रिल-२००६ मध्ये टेक्निकल असिस्टंट-२ व इतर दोन पदांकरिता जाहिरात काढली होती. त्यापूर्वी ७ वर्षांपासून रिसर्च असोसिएट पदावर कार्यरत असलेले झाडे यांनी टेक्निकल असिस्टंटपदासाठी अर्ज केला होता. त्यांची या पदावर तात्पुरती नियुक्तीही झाली होती. दरम्यान, दुसऱ्याला या पदावर सामावून घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लवादात अर्ज दाखल केला होता. २५ मार्च २००८ रोजी लवादाने याप्रकरणी जैसे थे परिस्थिती ठेवण्यास सांगून झाडे यांना पुढील आदेशापर्यंत रिसर्च असोसिएटपदावर कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते. तसेच, टेक्निकल असिस्टंटपदी दुसऱ्या उमेदवाराची नियुक्ती केल्यास ती प्रकरणाच्या निर्णयाधीन राहील असे स्पष्ट केले होते.
संस्थेने या आदेशाचे उल्लंघन करून झाडे यांची सेवा संपुष्टात आणली होती. अर्जदारातर्फे अ‍ॅड. श्रीकांत देव यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)

Web Title: 50 thousand rupees for 'CICR' operator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.