गरिबांसाठी ५० हजार घरे
By Admin | Updated: September 18, 2015 02:42 IST2015-09-18T02:42:43+5:302015-09-18T02:42:43+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० पर्यंत ‘सर्वांना घर’ देण्याचा संकल्प केला होता. या संकल्पपूर्तीसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात पुढाकार घेतला आहे.

गरिबांसाठी ५० हजार घरे
लोकमत शुभवार्ता
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० पर्यंत ‘सर्वांना घर’ देण्याचा संकल्प केला होता. या संकल्पपूर्तीसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात पुढाकार घेतला आहे. गडकरी यांनी गणेशस्थापनेच्या शुभ पर्वावर नागपूर शहरात गरिबांसाठी तब्बल ५० हजार घरे बांधण्याची घोषणा केली. या प्रकल्पांतर्गत ‘मॉडेल’ इमारतीचे बांधकाम येत्या १५ दिवसात सुरू केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गडकरी म्हणाले, संबंधित घरबांधणी प्रकल्पासाठी नासुप्र नोडल एजंसी म्हणून काम पाहणार असून २०० एकर जागेची निवड करण्यात आली आहे. आणखी जमिनीचा शोध घेतला जात आहे. जमिनीची किंमत केंद्र सरकार देईल. अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकाम खर्चात शक्य तेवढी कपात केली जाईल. प्रकल्पासाठी सिमेंट कंपन्यांशी चर्चा करून सिमेंटचे दर प्रती बॅग १२० ते १४० रुपये असे निश्चित करण्यात आले होते. संबंधित करार तीन वर्षांसाठी वाढविण्यात आला आहे. बांधकामावर सुमारे एक हजार रुपये प्रती चौरस फूट खर्च अपेक्षित आहे. घराचा आकार ४६५ ते ५०० चौरस फूट असेल. त्यामुळे पाच ते सहा लाखात घर मिळेल. घर पती व पत्नी दोघांच्या नावावर असेल. १० वर्षे घर विकता येणार नाही किंवा दुसऱ्याला हस्तांतरित करता येणार नाही, अशी अट असेल. लाभार्थ्याची निवड करताना आर्थिक उत्पन्नाचे काही निकष लावले जातील. प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नासुप्र सभापती श्याम वर्धने, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर या सर्वांचे सहकार्य मिळाले असल्याचे गडकरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
असे असेल स्वस्त घर
तळमजला व त्यावर आठ मजले असे या इमारतींचे स्वरूप असेल.
घरांचा आकार ४६५ ते ५०० चौरस फूट
महापालिकेतर्फे २४ तास पिण्याच्या पाण्याची सोय
२४ तास वीजपुरवठा
दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या व आठव्या मजल्यावर लिफ्टची सोय
घरात आवश्यक असलेले फर्निचर
संपूर्ण इमारतीसाठी सोलर वॉटर हीटरची व्यवस्था
बगीचा, खेळाच्या मैदानाचा समावेश