संस्कृत विद्यापीठाला ५० एकर जागा

By Admin | Updated: November 23, 2015 02:24 IST2015-11-23T02:24:47+5:302015-11-23T02:24:47+5:30

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी १९९७ साली रामटेक येथे कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उद्घाटन केले.

50 acres of land for Sanskrit University | संस्कृत विद्यापीठाला ५० एकर जागा

संस्कृत विद्यापीठाला ५० एकर जागा

मुख्यमंत्र्यांची घोषणा : विद्यापीठाच्या विद्याशाखांचा होणार विस्तार
नागपूर : माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी १९९७ साली रामटेक येथे कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उद्घाटन केले. ते विद्यापीठ आजतागायत रामटेक येथेच असून भविष्यातही विद्यापीठाचा संपूर्ण कारभार आणि शैक्षणिक कार्य रामटेक येथूनच होणार आहे. या विद्यापीठाचा विस्तार करण्यासाठी आणि काही नव्या विद्याशाखा निर्माण करण्यासाठी विद्यापीठाने केलेल्या विनंतीप्रमाणे शासनातर्फे नागपूर जवळील कालाडोंगरी येथे विद्यापीठाला ५० एकर जागा प्रदान करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
कालिदास महोत्सवात आयोजित पूर्व विदर्भ पर्यटन प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शासनाला विद्यापीठाने जागा मागितली होती. वेगवेगळ्या विद्याशाखांचा विस्तार करण्यासाठी शासनाने ५० एकर जागा विद्यापीठाला दिली आहे.
रामटेकमध्ये अकॅडमिक स्कूल, मॉडेल कॉलेज आणि रिसर्च सेंटर असेल. त्याप्रमाणेच नागपुरातही अकॅडमिक स्कूल, मॉडेल कॉलेज, रिसर्च सेंटर, लँग्वेज हब, संस्कृत, पाली आणि इतर भाषांचे संग्रहालय असेल. विद्यापीठात देशातील अनेक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमात सहभागी होतात. त्यांच्यासाठी केंद्र म्हणून विद्यापीठाची उपशाखा नागपुरात कार्य करते. पण विद्यापीठाला उपशाखेचा कारभार चालविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने विद्यापीठाने शासनाकडे जागेची मागणी केली होती.
त्याप्रमाणे विद्यापीठाला कालाडोंगरी येथे ५० एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. शासनाला करण्यात आलेली मागणी पूर्ण केली आहे. यासंदर्भातली सविस्तर माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री व्यस्त असल्याने कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या संस्कृत परिषदेला ते उपस्थित राहू शकले नाही पण त्यांच्यावतीने ५० एकर जागा प्रदान करण्याचे परिपत्रक विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांना जाहीरपणे प्रदान केले. (प्रतिनिधी)

Web Title: 50 acres of land for Sanskrit University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.