वन्यजीव संघर्षात १० वर्षात ४६६ व्यक्तींचा मृत्यू ; ठोस उत्तर नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 02:43 AM2020-10-13T02:43:32+5:302020-10-13T02:43:48+5:30

सर्वाधिक मृत्यू चालू वर्षात; वाघ-बिबटांची दहशत अधिक

466 deaths in 10 years of wildlife conflict; No concrete answer | वन्यजीव संघर्षात १० वर्षात ४६६ व्यक्तींचा मृत्यू ; ठोस उत्तर नाही

वन्यजीव संघर्षात १० वर्षात ४६६ व्यक्तींचा मृत्यू ; ठोस उत्तर नाही

Next

गोपालकृष्ण मांडवकर 

नागपूर : ‘वाघ वाचवा-जंंगल वाचवा’ अशी साद वनविभागाकडून घातली जात असली तरी मानव-वन्य जीव संघर्षावर अद्यापही ठोस उत्तर सापडलेले नाही. सहजीवनाचा स्वीकार करण्याचे आवाहन वनविभागाकडून केले जात आहे. त्याला काहीअंशी यश आले असले तरी हा संघर्ष थांबलेला नाही. परिणामत: मागील १० वर्षात राज्यात ४६६ व्यक्तींना जीव गमवावे लागले. तर वाघ, बिबट आणि अस्वल या ४५ प्राण्यांनाही या काळात जीव गमवावे लागले आहेत.

मागील १० वर्षात राज्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या सोबतच बिबट आणि अन्य प्राण्यांचीही संख्या वाढली आहे. वनविभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ३१२ वाघ असल्याची नोंद आहे. या १० वर्षाच्या काळात वाघ आणि बिबटांकडून मारल्या गेलेल्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. वाघांकडून १५३ तर बिबटांकडून १२८ व्यक्तींचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ रानडुकरांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा क्रमांक तिसरा असून ही संख्या ८९ आहे. आहे. त्यामुळे वाघ बिबटांची अधिक दहशत आहे.

१० वर्षात १६ वाघांचा विजेमुळे मृत्यू
विजेचा सापळा लावून वाघ आणि बिबटांची हत्या केल्याची प्रकरणे राज्यात अधिक आहेत. मागील जानेवारी-२०१० ते सप्टेंबर-२०२० या १० वर्षात १६ वाघ, १८ बिबट आणि ११ अस्वलांचा मृत्यू यामुळे झाला आहे. अर्थात जंगलात शिकारी टोळ्यांकडून आणि शेतकऱ्याननी पिकाच्या रक्षणासाठी लावलेल्या सापळ्यांमुळे या घटना घडल्या आहेत. या सोबत, विषप्रयोगाच्याही घटना वेगळ्या आहेत.

सर्वाधिक मृत्यू चालू वर्षात
वन्यजीव संघर्षातील माणसांचे सर्वाधिक मृत्यू चालू वर्षातील आहेत. सप्टेंबर-२०२० अखेरपर्यंत ही संख्या ५६ वर पोहचली आहे. २०१६ मध्ये हाच आकडा होता. या तुलनेत मागील वर्षात २०१९ मध्ये फक्त ३९ व्यक्तींच्या मृत्यूंची नोंद वनविभागाकडे आहे. २०१७ मध्ये ही संख्या ५४ होती.

Web Title: 466 deaths in 10 years of wildlife conflict; No concrete answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.