नागपूर : भरधाव बसवरील चालकाचा ताबा सुटत असल्याचे लक्षात येताच, प्रवाशांनी चालकाला बस थांबविण्यास बाध्य केले. बस थांबताच सर्व प्रवासी खाली उतरल्याने बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले. या बसमध्ये एकूण ४६ प्रवासी प्रवास करीत होते. ही घटना काटोल-नागपूर मार्गावरील हातला शिवारात शनिवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. एस.टी. महामंडळाच्या नागपूर आगाराची (एन-१) एमएच-४०/एन-८८११ क्रमांकाची मोर्शी-नागपूर ही बस वरुड बसस्थानकाहून सकाळी १० वाजताच्या सुमारास सुटली. सदर बस काटोल बसस्थानकावर ११ वाजताच्या सुमारास पोहोचली. येथे बसचालक ओमप्रकाश ढोले हा नाश्ता करण्याच्या निमित्ताने बाहेर गेला. तब्बल २५ मिनिटांनी परत आल्यानंतर ही बस काटोलहून नागपूरकडे यायला निघाली. सदर बस काटोलपासून अंदाजे चार कि.मी. अंतरावरील हातला शिवारात येताच चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे विरुद्ध दिशेने येणारे दोन दुचाकीचालक आणि एक कारचालक बसची धडक होण्यापासून थोडक्यात बचावले. त्यानंतर ही बस लगेच डाव्या बाजूने झुकत रोडच्या कडेला जात असल्याचे लक्षात येताच, चालकाच्या कॅबिनमध्ये बसलेल्या दोन प्रवाशांनी चालकाला बस थांबविण्याची सूचना केली. तो काहीही ऐकायला तयार नसल्याने दोन्ही प्रवाशांनी आवाज चढविला. हा प्रकार बसमधील इतर प्रवाशांच्या लक्षात येताच, प्रवासी आक्रमक झाले आणि चालकाने बस थांबविली. बसचालक दारू प्यायला असल्याने त्याचा बसवरील ताबा सुटत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. काही प्रवासी आक्रमक झाले होते. प्रवाशांनी सदर प्रकाराची सूचना लगेच काटोल व नंतर नागपूर आगाराला दिली. काटोलचे घाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता, ही बस नागपूर आगाराची असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या बसवर काटोल आगाराचा उल्लेख आहे. शिवाय नागपूर आगारातील गाडे व नागपूर आगार (एन-१)चे व्यवस्थापक झाडे यांनाही दूरध्वनीवरून सदर प्रकारची माहिती देण्यात आली. काटोल आगारातून अतिरिक्त चालकाला पाठविण्यात येत असल्याची माहिती झाडे यांनी दिली. दरम्यान, बसमधील प्रवासी महामंडळाच्या दोन बसने नागपूरकडे रवाना झाले. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे बसमधील ४६ प्रवासी थोडक्यात बचावले. (जिल्हा प्रतिनिधी)
४६ प्रवासी थोडक्यात बचावले
By admin | Updated: May 11, 2014 01:29 IST