४५ हजार झाडे लावण्याचा संंकल्प
By Admin | Updated: June 25, 2017 02:10 IST2017-06-25T02:10:49+5:302017-06-25T02:10:49+5:30
महाराष्ट्र शासनाच्या एक पाऊल हरितक्रांतीकडे या विशेष उपक्रमांतर्गत महापालिकेने १ जुलै ते ७ जुलै

४५ हजार झाडे लावण्याचा संंकल्प
एक पाऊ ल हरितक्रांतीकडे : मनपाचे नागरिकांना आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या एक पाऊल हरितक्रांतीकडे या विशेष उपक्रमांतर्गत महापालिकेने १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत नागपूर शहरात ४५ हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. वृक्षारोपणासाठी महापालिका रोपटे उपलब्ध करणार आहे. यासाठी नागरिकांनी व संस्थांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी नोंदवावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी आढावा बैठकीत केले.
उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, कर आकारणी व कर संकलन सभापती अविनाश ठाकरे, अपर आयुक्त आर. झेड. सिद्दीकी, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.वृक्षलागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी फ्लॅट, सोसायटी, वॉर्ड, मोहल्ला, सार्वजनिक ठिकाणी १५ हजार, शाळा-महाविद्यालये आदी ठिकाणी ७,५००, सिमेंट रस्ते, मुख्य रस्त्यांच्या बाजूला ७,५००, कॉर्पोरेट कंपन्या, संस्था, क्रेडाईसारख्या संस्था १५ हजार झाडे शहरात विविध ठिकाणी लावणार आहेत. झाडांची मागणी नोंदविण्यासाठी झोनस्तरावर व्यवस्था करण्यात आली आहे. झोनचे सहायक आयुक्त आणि त्यांच्या प्रतिनिधींकडून झोननिहाय वृक्ष लागवड तयारीचा आढावा घेण्यात आला. महापालिका शाळांतील जे विद्यार्थी याची संपूर्ण माहिती शिक्षण विभागातर्फे आॅनलाईन ठेवली जाणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी दिली. लागवड करण्यात येणाऱ्या सर्व ४५ हजार वृक्षांचा रेकॉर्ड आॅनलाईन करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, झोन सभापती रूपा रॉय, दीपक वाडीभस्मे, भाग्यश्री कानतोडे, सुषमा चौधरी, उद्यान अधीक्षक संजय माटे, सहायक आयुक्त महेश मोरोणे, गणेश राठोड, प्रकाश वराडे, सुभाषचंद्र जयदेव, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदी उपस्थित होते.
ट्री-गार्डचे प्रात्यक्षिक
रेनबो ग्रीनर्स प्रा. लि. या कंपनीने आगळ्यावेगळ्या ट्री-गार्डचे सादरीकरण केले. हे ट्री-गार्ड ६ फूट उंच असून त्यात तेवढ्याच उंचीची झाडे लावता येतील. त्यात डीप सिस्टीम असून एकदा पाणी दिल्यानंतर १५ दिवस पाणी देण्याची गरज पडणार नाही. या ट्री-गार्डला चोरांची आणि जनावरांचीही भीती नाही. दोन वर्षात या ट्री-गार्डमधील झाड पूर्णपणे आकार घेईल. या ट्री-गार्ड संदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.