८९ रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे ४३९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:07 IST2021-05-28T04:07:01+5:302021-05-28T04:07:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच म्युकरमायकोसिस(ब्लॅक फंगस) च्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ...

८९ रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे ४३९ रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच म्युकरमायकोसिस(ब्लॅक फंगस) च्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यातील ८९ रुग्णालयांमध्ये सध्या या आजाराचे ४३९ रुग्ण भरती आहेत. दरम्यान, या आजारात उपयोगात येणारे एमफोटेरेसिन बी चे ११५० इंजेक्शन गुरुवारी नागपूरला प्राप्त झाले. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पुरवठा असला तरी रुग्णांची संख्या पाहता या इंजेक्शनचा तुटवडा अजूनही संपलेला नाही.
म्युकरमायकोसिसने पीडित बहुतांश रुग्णांना बरे करण्यासाठी एमफोटेरेसिन बी चे ४० इंजेक्शन लावावे लागतात. आजार पसरताच या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला. रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शनसाठी भटकू लागले. काळाबाजारही सुरू झाला. परिस्थितीचे गांभीर्य पाहता सरकारने या इंजेक्शनला आपल्या नियंत्रणात घेतले. आता जिल्हाधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमाततून थेट रुग्णालयांना हे इंजेक्शन वितरित करीत आहेत. या वितरणानुसार जिल्ह्यातील एकूण ८९ रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण आहेत. सर्वाधिक २३७ रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया(मेयो)मध्येही १०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अन्न व औषधी प्रशासन विभागानुसार वर्धा येथील कंपनीतून उत्पादन सुरू झाल्यावर या इंजेक्शनचा तुटवडा कमी होण्याची शक्यता आहे.