मनपा कर्मचाऱ्यांची ४२१ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:11 IST2021-08-26T04:11:22+5:302021-08-26T04:11:22+5:30
बीसीपीएसमधील जमा रकमेची नोंद नाही : सेवानिवृत्तांच्या अडचणी वाढल्या लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका कर्मचाऱ्यांची सहाव्या व सातव्या ...

मनपा कर्मचाऱ्यांची ४२१ कोटींची थकबाकी
बीसीपीएसमधील जमा रकमेची नोंद नाही : सेवानिवृत्तांच्या अडचणी वाढल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका कर्मचाऱ्यांची सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, भविष्य निर्वाह निधी व अंशदान पेन्शन योजनेची (बीसीपीएस) थकबाकी व महागाई भत्ता गृहित धरता ४२१ कोटींची थकबाकी आहे.
मनपा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली सहा महिन्याची भविष्य निधीची २४ कोटींची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे गत काळात हा निधी परस्पर दुसऱ्या कामावर खर्च करण्यात आला. यावर व्याज कोण भरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु तत्कालीन अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
२००५ नंतर मनपा सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ मिळत नाही. बीसीपीएस योजनेचा लाभ दिला जातो. यात दरमहा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ठराविक रक्कम जमा केली जाते. परंतु कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली २४ कोटींची रक्कम त्यांच्या खात्यात जमाच केलेली नाही. चार वर्षांपासून याच्या पावत्याही दिल्या जात नसल्याची धक्कादायक माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.
निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी वा अंशदान पेन्शन योजनेची रक्कम तात्काळ मिळणे अपेक्षित आहे. परंतु मनपाने ही रककम जमा केली नसल्याने कर्मचाऱ्यांना या रकमेसाठी भटकंती करावी लागते. यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
मनपा कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२१ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. वेतन आयोग लागू करताना १६ महिन्याची १७५ कोटींची थकबाकी १६ हप्त्यात देण्याचे ठरले होते. पहिल्या हप्त्यात काही ठराविक विभागातील कर्मचाऱ्यांना ही रक्कम मिळाली. त्यानंतर ही रक्कम वेतनासोबत देणे बंद केले. अशीच सहाव्या वेतन आयोगाची १७० कोटींची थकबाकी आहे.
...
पैसा किती जमा याची माहितीच नाही
वेतनातून कपात करण्यात आलेली अंशदान पेन्शन योजनेची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. एवढेच नव्हे तर बँकेत यासाठी खाते उघडण्यात आलेले नाही. भविष्य निर्वाह निधीचाही असाच घोळ आहे. कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची थकबाकी गृहित धरता ही रक्कम ४५० कोटींवर जाते. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा राष्ट्रीय नागपूर काॅपोंरेशन एम्प्लाॅईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, रंजन नलोडे व प्रवीण तंत्रपाळे आदींनी दिला आहे.
...
मनपा कर्मचाऱ्यांची थकबाकी (कोटी)
सहावा वेतन आयोग - १७०
सातवा वेतन आयोग - १७५
भविष्य निर्वाह निधी - २४
अंशदान पेन्शन योजना - २४
महागाई भत्ता - २८
एकूण ४२१