४० हजार प्रवासी तक्रारी केवळ ७ !
By Admin | Updated: June 6, 2015 02:12 IST2015-06-06T02:12:19+5:302015-06-06T02:12:19+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज ३५ ते ४० हजार प्रवासी ये-जा करतात. त्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने १८२ हा हेल्पलाईन

४० हजार प्रवासी तक्रारी केवळ ७ !
जनजागृतीचा अभाव : ‘हेल्पलाईन’ क्रमांकाला हवी प्रचार-प्रसाराची ‘हेल्प’
दयानंद पाईकराव ल्ल नागपूर
नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज ३५ ते ४० हजार प्रवासी ये-जा करतात. त्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने १८२ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला. परंतु या क्रमांकाबाबत प्रवाशांमध्ये जनजागृतीच करण्यात येत नसल्यामुळे या सुविधेपासून हजारो रेल्वे प्रवासी वंचित राहत असल्याची वस्तुस्थिती आहे. या हेल्पलाईनवर केवळ सात तक्रारींची नोंद होत असल्यामुळे या क्रमांकाबाबत व्यापक प्रसिद्धी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रेल्वेगाडीत प्रवास करताना प्रवाशांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. चालू गाडीत कोणाला मदत मागायची हा प्रश्न निर्माण होतो. रेल्वेगाड्यात असामाजिक तत्त्वांच्या हालचाली वाढीस लागल्या आहेत. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींवर अंकुश लावण्यासाठी आणि त्यांना रेल्वे प्रवासात सुरक्षितता प्रदान करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १८२ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला. परंतु केवळ हा क्रमांक उपलब्ध करून रेल्वे प्रशासनाने आपली जबाबदारी झटकल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात या क्रमांकाबाबत प्रवाशांना माहिती देण्यासाठी कुठलीच उपाययोजना होताना दिसत नाही. रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या क्रमांकाबाबत रेल्वेस्थानकावर ध्वनिक्षेपकावरून सूचना देणे गरजेचे आहे. याशिवाय रेल्वेगाड्यात स्टीकर्स लावणे, आकाशवाणी, दूरदर्शनवर जाहिराती देणे या उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे. परंतु यापैकी कुठलीच बाब होताना दिसत नाही.
अशी आहे सुविधा
रेल्वेगाडीत प्रवासी प्रवास करताना त्यास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अडचण आल्यास त्याने १८२ क्रमांक डायल करावयाचा आहे. हा क्रमांक रेल्वेच्या नियंत्रण कक्षात उचलल्या जाईल. एखादा प्रवासी नागपूर स्थानकावरून गाडीत बसला आणि त्यास अडचण असली तर पुढील स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान त्या प्रवाशाची समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.