प्रवाशांअभावी एसटीच्या ४० टक्के फेऱ्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST2021-03-14T04:08:01+5:302021-03-14T04:08:01+5:30
नागपूर : प्रशासनाने १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊन जाहीर केले आहे. परंतु शनिवार आणि रविवारी बंद असल्यामुळे शनिवारी ...

प्रवाशांअभावी एसटीच्या ४० टक्के फेऱ्या रद्द
नागपूर : प्रशासनाने १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊन जाहीर केले आहे. परंतु शनिवार आणि रविवारी बंद असल्यामुळे शनिवारी बहुतांश प्रवासी घराबाहेर पडले नाही. परिणामी एसटीच्या नागपूर विभागात ४० टक्के फेऱ्या रद्द करण्याची पाळी आली. यामुळे नागपूर विभागाला २० लाखांचा फटका बसला आहे.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी शहरात बंद पाळण्यात येत असल्यामुळे शनिवारपासूनच खऱ्या अर्थाने लॉकडाऊन सुरू झाले आहे. याचा परिणाम एसटी महामंडळाच्या वाहतुकीवर झाला आहे. शनिवारी प्रवासी कमी संख्येने घराबाहेर पडले. लॉकडाऊनच्या निर्णयापूर्वी नागपूर विभागात ४०० बसेस धावत होत्या. या बसेस १ लाख ४० हजार किलोमीटर अंतर पूर्ण करीत होत्या. विभागाला एका दिवशी ४२ लाख रुपये उत्पन्न मिळत होते. परंतु शनिवारी प्रवासी घराबाहेर न पडल्यामुळे नागपूर विभागात केवळ २६० बसेस धावल्या. केवळ ८० हजार किलोमीटर अंतर या बसेसने पूर्ण केले. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. विभागाला केवळ २२ लाख उत्पन्न मिळाले. शनिवारी नागपूर विभागाला २० लाखांचा फटका बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात एका बसमध्ये केवळ २२ प्रवासी बसणार आहेत. त्यामुळे हे उत्पन्न आणखी कमी होणार असून एसटीचा तोटा आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
................
प्रवासी नसल्यामुळे फेऱ्या रद्द
‘शनिवारी नागपूर विभागात प्रवाशांनी प्रवास करण्याचे टाळले. त्यामुळे एसटी महामंडळाला ४० टक्के फेऱ्या रद्द करण्याची पाळी आली. यात विभागाचे २० लाखाचे नुकसान झाले आहे.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक
...........