मोक्का न्यायालयातून सरवरला ४ पर्यंत पीसीआर
By Admin | Updated: July 30, 2015 03:19 IST2015-07-30T03:19:20+5:302015-07-30T03:19:20+5:30
चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील शांतिनगर शिक्षक कॉलनी येथे एका प्रॉपर्टी डीलरला खंडणीसाठी गोळ्या झाडून ठार ...

मोक्का न्यायालयातून सरवरला ४ पर्यंत पीसीआर
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील शांतिनगर शिक्षक कॉलनी येथे एका प्रॉपर्टी डीलरला खंडणीसाठी गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मोक्काची कारवाई झालेल्या संघटित गुन्हेगारी टोळीच्या म्होरक्याला मंगळवारी मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुनावला. मोक्काच्या या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला आणखी ६० दिवसांचा अवधी वाढवून दिला. शेख हाजीबाबा शेख सरवर (३२) रा. नकोडा, असे या म्होरक्याचे नाव आहे. विक्की ऊर्फ संतोष भास्कर दुसाने (२२) रा. गडचांदूर, असे त्याच्या साथीदाराचे नाव असून हल्ल्याच्या मूळ प्रकरणात जामीन मिळालेला आहे. त्याला मोक्काच्या प्रकरणात अटक करावयाची असल्याने तपास अधिकाऱ्याने त्याचा जामीन रद्द व्हावा यासाठी एक अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, शांतिनगर शिक्षक कॉलनी येथे राहणारे अरविंद ऊर्फ अरुण तुकाराम डोहे हे भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. प्रारंभी आरोपींनी त्यांना रफिक नावाने मोबाईलने संपर्क साधून खंडणीची मागणी केली होती.
खंडणी दिली नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. १७ एप्रिल २०१५ रोजी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास या आरोपींनी मोटरसायकलवर डोहे यांचे घर गाठून त्यांच्या दारावार गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या होत्या आणि डोहे यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. डोहे यांच्या तक्रारीवरून गडचांदूर पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी शेख हाजीबाबा शेख सरवर याला अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करून त्याचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)