कोविड हॉस्पिटलला आग, ४ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:09 IST2021-04-10T04:09:10+5:302021-04-10T04:09:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर-अमरावती राेडवरील वाडी येथे शुक्रवारी काेराेना रुग्णांवर उपचार हाेत असलेल्या ‘वेल ट्रिट हाॅस्पिटल’ला अचानक ...

कोविड हॉस्पिटलला आग, ४ जणांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर-अमरावती राेडवरील वाडी येथे शुक्रवारी काेराेना रुग्णांवर उपचार हाेत असलेल्या ‘वेल ट्रिट हाॅस्पिटल’ला अचानक भीषण आग लागल्याने कमीतकमी चार रुग्ण दगावल्याची माहिती आहे. रात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या वेळी रुग्णालयामध्ये काेराेना रुग्णांसह इतर आजारांचे जवळपास ५० रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे.
मृतांमधील तुळशीराम पाल या एका व्यक्तीची ओळख पटली असून, इतर तिघांची ओळख पटायची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजताच्या सुमारास वाडीतील पूजा चेंबर्स बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या वेल ट्रिट हाॅस्पिटलमध्ये तिसऱ्या व चाैथ्या माळ्यावर आयसीयूमध्ये अचानक आग लागली. एसीमध्ये बिघाड झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी तिसऱ्या माळ्यावर १७ रुग्ण तर चाैथ्या माळ्यावर ५ रुग्णांवर उपचार सुरू हाेते. संपूर्ण रुग्णालयात ५० च्या जवळपास रुग्ण असल्याची माहिती आहे. आग लागताच नर्सने एसीजवळील रुग्णांचे बेड हलविण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाेहोचल्या. अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ताेपर्यंत आगीच्या धुरामुळे श्वास काेंडल्याने अनेक जण अत्यवस्थ झाले. त्यातील तुळशीराम पाल नामक रुग्णाचा मृत्यू झाला. याशिवाय मेडिकलमध्ये आणताना तीन रुग्ण दगावले. रुग्णालयाच्या आयसीयूतील इतरही काही रुग्ण गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.