३८५ डॉगीचा ‘एसी’ तून प्रवास
By Admin | Updated: June 5, 2015 02:33 IST2015-06-05T02:33:10+5:302015-06-05T02:33:10+5:30
कुत्रा म्हटले की या गल्लीतून त्या गल्लीत भटकंती करणारा प्राणी. फिर-फिर फिरून थकला की कुठेतरी विसावा घ्यायचा अन् पुन्हा तीच भटकंती.

३८५ डॉगीचा ‘एसी’ तून प्रवास
दयानंद पाईकराव नागपूर
कुत्रा म्हटले की या गल्लीतून त्या गल्लीत भटकंती करणारा प्राणी. फिर-फिर फिरून थकला की कुठेतरी विसावा घ्यायचा अन् पुन्हा तीच भटकंती. समाजात जसा गरीब आणि श्रीमंत हा वर्ग असतो तसाच काही कुत्र्यांचा ‘क्लास’ हा थोडा वेगळा असतो. हा ‘क्लास’आहे पाळीव कुत्र्यांचा. घरातील सदस्य असल्याने अशा कुत्र्यांची विशेष काळजी घेण्यात येते. फिरायला गेले की त्याला सोबत नेणे, खाण्यासाठी महागडे डॉगफूड या बाबी सर्वांनाच ठाऊक आहेत. परंतु खरी पंचाईत होते ती कुत्रा पाळलेल्या कुटुंबास बाहेरगावी जाताना. आपल्या लाडक्या ‘डॉगी’ला कुठे ठेवावे असा प्रश्न त्यांना पडतो. मागील वर्षी शहरातील ३८५ नागरिकांनी आपल्या कुत्र्यांना एसी डब्याचा प्रवास घडविला. यासाठी रेल्वेला तब्बल ६५ हजारांचे उत्पन्न मिळाले.
कुत्रा हा प्राणी अनेकांच्या जिव्हाळ््याचा विषय आहे. घरातील सदस्याप्रमाणे अनेक नागरिक त्याची काळजी घेतात. अनेकांनी घेतला नसेल तो आनंद उपराजधानीतील ३८५ कुत्र्यांनी घेतला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१४ दरम्यान ३८५कुत्र्यांनी एसी डब्यातून प्रवास करून रेल्वेच्या उत्पन्नात ६५ हजारांची भर घातली. तर ७१ बकऱ्यांनीही रेल्वेने प्रवास करीत रेल्वेला आठ हजारांचे उत्पन्न मिळवून दिले. गोरगरीब अन् श्रीमंतांचे प्रवासाचे सर्वाधिक लोकप्रिय माध्यम म्हणजे रेल्वे. खूपच गरीब व्यक्ती असेल तर तो चालू तिकीट घेऊन जनरल डब्यात चढतो. मध्यमवर्गातला असेल तर तो स्लिपरक्लासचे आरक्षण करतो. त्याहीपेक्षा आर्थिक परिस्थिती उत्तम असणारा एसी थ्री टायरने प्रवास करण्याला पसंती देतो. २०१४ मध्ये ३८५ कुत्र्यांना एसी डब्याचा प्रवास घडला. त्यापोटी रेल्वेला ६५ हजार ९४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. यात ७१ बकऱ्यांनीही रेल्वेने प्रवास करून रेल्वेला ८ हजार १०७ रुपये मिळवून दिल्याची माहिती आहे.
अशी आहे प्रक्रिया
कुत्र्याला रेल्वेतून नेण्यासाठी गाडी सुटण्याच्या एक किंवा दोन तास पूर्वी बुकिंग करावी लागते. कुत्र्याला फक्त एसी फर्स्टक्लासने नेता येऊ शकते. या डब्यात वेगवेगळे ‘कुपे’ (कंपार्टमेंट) असल्यामुळे इतर प्रवाशांना त्याचा त्रास होत नाही. परंतु एखाद्या प्रवाशाकडे एसी टु टायर, एसी थ्री टायर किंवा स्लिपरक्लासचे तिकीट असेल आणि त्यास आपल्या कुत्र्याला सोबत न्यायचे असेल, तर त्याला गार्डच्या‘ब्रेक व्हॅन’मधील पिंजऱ्यात ठेवावे लागते. ब्रेक व्हॅनमध्ये एखादा ६० किलोचा कुत्रा मुंबईला न्यायचा असेल तर त्यास १०५ रुपये आणि एसी डब्यातून न्यायचा असेल २१० रुपये मोजावे लागतात.