सुमेध वाघमारे
नागपूर : बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी शासनाकडून विविध कार्यक्रम राबविले जातात. यावर कोट्यवधीचा निधी खर्च होतो. परंतु अपेक्षेनुसार यश येत नसल्याचे दरवर्षीचे चित्र आहे. परंतु कोरोना काळात प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन केल्याने बालके इतर साथीच्या आजारांपासून दूर राहिली. परिणामी, कोरोनाच्या काळात बालमृत्यूच्या प्रमाणात ३८ टक्क्याने घट आली. २०१९ मध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात ३७४ तर २०२०मध्ये २३४ बालमृत्यूची नोंद झाली.
पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भावाला सुरूवात झाली. ‘लॉकडाऊन’मुळे अनेकांचे घराबाहेर पडणे बंद झाले. शाळाही बंद पडल्या. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आजारी व्यक्तींपासून स्वत:ला दूर ठेवणे, मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे, गर्दीचे ठिकाण टाळणे, शारीरिक अंतर पाळणे आदी नियमांचे पालन सुरू झाले. घरी लहान मुले असलेल्या पालकांनी याकडे विशेष लक्ष दिले. यामुळे जंतू संसर्ग व सेप्सीसपासून लहान मुले दूर राहिल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नागपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठी घट
इतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपूर व गडचिरोली जिल्ह्यात बालमृत्यूच्या प्रमाणात ७२ टक्क्याने मोठी घट झाली. आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये नागपूर जिल्ह्यात १०६, भंडारा जिल्ह्यात ५१, गोंदिया जिल्ह्यात ४३, चंद्रपूर जिल्ह्यात ७९, गडचिरोली जिल्ह्यात ५५ तर वर्धा जिल्ह्यात ४० बालकांचे मृत्यू झाले. तर, २०२० मध्ये नागपूर जिल्ह्यात ७७ (७२ टक्के), भंडारा जिल्ह्यात २७ (५२ टक्के), गोंदिया जिल्ह्यात २६ (६० टक्के), चंद्रपूर जिल्ह्यात ४६ (५८ टक्के), गडचिरोली जिल्ह्यात ४० (७२ टक्के) तर वर्धा जिल्ह्यात १८ (४५ टक्के) बालकांचे मृत्यू झाले.
बालमृत्यूची कारणे
अकाली जन्मलेले बालक, जन्मत: कमी वजनाचे बालक, जंतू संसर्ग, न्यूमोनिया, सेप्सीस, जन्मत: आघात ही नवजात बालकांच्या मृत्यूची कारणे आहेत. तर ५ ते १४ वयोगटामध्ये निमोनिया व डायरीया मृत्यूचे मुख्य कारण आहे. परंतु कोरोनामुळे आवश्यक खबरदारी घेतल्याने बालके गंभीर आजारापासून दूर राहिली.
पालकांनी काळजी घेतल्याने हे शक्य झाले
कोरोना काळात पालकांनी आपल्या नवजात बाळाला आयसोलेशन केले. स्वत:ला आजारापासून दूर ठेवले. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, कपडे व इतर बाबींची स्वच्छता बाळगली. लहान बालकांना घराबाहेर पडू दिले नाही. यामुळे साथरोग जास्त प्रमाणात उद्भवले नाहीत. पालकांनी बालकांची विशेष काळजी घेतल्यामुळेच बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले.
-डॉ. वसंत खळतकर
बालरोग तज्ज्ञ
वर्षभंडारागोंदियाचंद्रपूरगडचिरोलीनागपूर वर्धा एकूण
२०१९ ५१ ४३ ७९ ५५ १०६ ४० ३७४
२०२० २७ २६ ४६ ४० ७७ १८ २३४