सीबीएसईचे ३७,५०० विद्यार्थी परीक्षा न देता होणार पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:06 IST2021-04-18T04:06:47+5:302021-04-18T04:06:47+5:30
दहावीच्या परीक्षा सीबीएसई बोर्डाने केल्या रद्द : पालकांच्या संमिश्र प्रतिक्रीया नागपूर : देशभरात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता केंद्रीय ...

सीबीएसईचे ३७,५०० विद्यार्थी परीक्षा न देता होणार पास
दहावीच्या परीक्षा सीबीएसई बोर्डाने केल्या रद्द : पालकांच्या संमिश्र प्रतिक्रीया
नागपूर : देशभरात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता केंद्रीय शिक्षा बोर्ड (सीबीएसई) ने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढच्या वर्गात पदोन्नती मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यात किमान ३७,५०० च्या जवळपास सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
नागपुरात असलेल्या सीबीएसईच्या शाळांनी विशेष म्हणजे नियमित ऑनलाइन वर्ग घेतले. दहावीच्या विद्यार्थ्यांची तयारी सत्र सुरू होण्यापूर्वीच करून घेतली. शाळेच्या स्तरावर विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा देखील घेण्यात आल्या. पण कोरोनामुळे बोर्डाला परीक्षा घेणे शक्य झाले नाही. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिला.
- सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी - ३७,५०० (अंदाजे)
- सीबीएसईने मुलांच्या जीवाला महत्त्व देऊन चांगला निर्णय घेतला आहे. शाळांनी यंदा ऑनलाइन क्लासेस घेतले, परीक्षाही घेतल्या. त्याच आधारवर विद्यार्थ्यांचे इंटरनल असेसमेंट करून गुण द्यायचे आहे. शिवाय पुढच्या वर्गात प्रवेशासाठी सुद्धा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून बोर्ड काही गोष्टी शिथिल करतील, अशी अपेक्षा आहे.
दीपाली डबली, शिक्षिका
- ऑनलाइन पर्याय होता
वर्षभर शाळांनी मुलांना ऑनलाइन शिकविले. ऑनलाइन परीक्षा सुद्धा घेतल्या. त्याच धर्तीवर बोर्डाने ऑनलाइन परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात घेता आल्या असत्या. परीक्षेच्या आयोजनात टेक्नॉलॉजीचा वापर करायला हवा होता. कारण मुलांनी अभ्यास केला आहे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाचे मूल्यांकन व्हायला हवे होते.
योगेश पाथरे, राष्ट्रीय शिक्षक पालक संघटन
- मुलांनी अभ्यास केल्यामुळे त्यांना वाईट वाटते. पण पालक म्हणून अशा परिस्थितीत मुलांची काळजीही महत्त्वाची आहे. त्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय योग्य आहे. फक्त भविष्यात त्यांची दहावीची मार्कलिस्ट बघून करीअरच्या दृष्टिकोनातून बाधा यायला नको.
सुरेखा अग्रवाल, पालक
- मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय योग्य आहे. पण शाळांनी जसे वर्षभर वर्ग घेतले, परीक्षाही घेतल्या. त्या माध्यमातून घेता आल्या असता, याचा विचार व्हायला हवा होता.
संजय बन्सोड, पालक