३७ जनावरांची सुटका
By Admin | Updated: June 20, 2016 02:55 IST2016-06-20T02:55:30+5:302016-06-20T02:55:30+5:30
भंडाऱ्यावरून अवैधरीत्या ३७ जनावरे भरून कामठी शहरातील अवैध कत्तलखान्यात कत्तलीसाठी जात असलेला ट्रक नवीन कामठी पोलिसांनी पकडला.

३७ जनावरांची सुटका
१२ लाखांचा ऐवज जप्त : आवंढी शिवारात कामठी पोलिसांची कारवाई
कामठी : भंडाऱ्यावरून अवैधरीत्या ३७ जनावरे भरून कामठी शहरातील अवैध कत्तलखान्यात कत्तलीसाठी जात असलेला ट्रक नवीन कामठी पोलिसांनी पकडला. यात १२ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आवंढी शिवारात रविवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास केलेल्या या कारवाईमुळे ३६ जनावरांना जीवनदान मिळाले तर एका जनावराचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजीमंडी कामठी येथील अन्वर अली शबीर अली (३१) याने ट्रक क्रमांक सीजी-०४/जेए-७४९९ मध्ये भंडाऱ्यावरून अवैधरीत्या १३ बैल व २४ गोऱ्हे भरून कामठीतील अवैध कत्तलखान्यात घेऊन येत होता. याबाबत माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी आवंढी शिवारात सदर ट्रक अडवून तपासणी केली असता, ट्रकमध्ये एकूण ३७ जनावरांना निदर्यतेने कोंबून त्यांची वाहतूक केली जात असल्याचे आढळले. पोलिसांनी ३७ जनावरे भरलेला ट्रक कामठीतील गोरक्षण केंद्रात आणून ३६ जनावरांना जीवदान दिले. यातील एका गोऱ्ह्याचा मृत्यू झाला होता. गुरांची एकूण किंमत ४ लाख २५ हजार रुपये व ट्रकची किंमत आठ लाख रुपये असा एकूण १२ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात आरोपी अन्वर अली शबीर अली याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५, ५अ(१)(२) व प्राण्यांना निदर्यतेने वागणूक कायदा कलम ११,१(ड) नुसार गुन्हा नोंदविला असून आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अमिताभ कुमार यादव, ठाणेदार उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष चचेरे, रमेश चहारे, रवी अहीर, संजय गीते, जितेंद्र सहारे यांच्या पथकाने बजावली. (तालुका प्रतिनिधी)