३६१ विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:34+5:302021-04-05T04:07:34+5:30

नागपूर : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला ...

361 students will get transport allowance | ३६१ विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता

३६१ विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता

नागपूर : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात ३६१ विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना दरमहा ३०० रुपयांप्रमाणे फेब्रुवारी व मार्च अशा दोन महिन्यांचा भत्ता त्यांच्या आईच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

सक्तीचा शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत कलम ६ (३) (१) नुसार नजीकच्या शाळांच्या क्षेत्रामध्ये किंवा हद्दीच्या आत शाळा उपलब्ध नाहीत अशा वस्तींमधील ६ ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्यासाठी मोफत परिवहन सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. जेथे एसटीची सुविधा नाही तेथे केंद्र शासनाकडून वाहतुकीकरिता प्रती विद्यार्थी दर महिन्याला ३०० रुपये, असे १० महिन्यांसाठी तीन हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात येते. यावर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांना १० महिन्यांऐवजी केवळ दोन महिन्यांचा वाहतूक भत्ता मिळणार आहे. जिल्ह्यातील ३६१ विद्यार्थी त्यासाठी पात्र ठरले आहेत.

- कोरोनाचा बसला फटका

यावर्षी कोरोनामुळे शाळा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यामुळे पूर्ण शैक्षणिक वर्षात हे वर्ग दोन महिने सुरू राहिले. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्गच यावर्षी झाले नाहीत. त्यामुळे शासनाने ५ ते ८ च्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवासभत्ता दिला आहे.

- दृष्टिक्षेपात

शहरी भागात एकही विद्यार्थी वाहतूक भत्त्यासाठी पात्र ठरला नाही. ग्रामीण भागातील ३६१ विद्यार्थी पात्र ठरले. त्यांना दरमहा ३०० रुपये असे दोन महिन्यांकरिता ६०० रुपयांप्रमाणे २,१६,६६० रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.

- भत्त्याचा निधी वितरणाची कार्यवाही लवकरच पूर्ण होईल

शासनाने २७ जानेवारी २०२१ रोजी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील ३६१ विद्यार्थी वाहतूक भत्त्यासाठी पात्र ठरले. शासनाच्या निर्देशानुसार लवकरच विद्यार्थ्यांच्या आईच्या खात्यात निधी वितरित करण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: 361 students will get transport allowance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.