नागपुरातून ३६ जणांची वैद्यकीय चमू जाणार केरळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:21 IST2018-08-20T22:19:55+5:302018-08-20T22:21:41+5:30
केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांसोबतच आता वैद्यकीय शिक्षण विभागही पुढे आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानेही राज्यातील सर्व उपसंचालकांना आपली वैद्यकीय चमू तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर मंडळाची ३६ जणांची वैद्यकीय चमू केरळला जाण्यासाठी तयार झाली आहे. आदेश येताच ही चमू केरळसाठी रवाना होईल.

नागपुरातून ३६ जणांची वैद्यकीय चमू जाणार केरळला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांसोबतच आता वैद्यकीय शिक्षण विभागही पुढे आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानेही राज्यातील सर्व उपसंचालकांना आपली वैद्यकीय चमू तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर मंडळाची ३६ जणांची वैद्यकीय चमू केरळला जाण्यासाठी तयार झाली आहे. आदेश येताच ही चमू केरळसाठी रवाना होईल.
केरळ पूरग्रस्तांना सर्वाधिक गरज वैद्यकीय सेवेची आहे. सोमवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जे.जे. रुग्णालयातील १०० वैद्यकीय चमू केरळकडे रवाना झाली. काही वैद्यकीय विद्यार्थी औषधांची जुळवाजुळव करण्यासाठी सरसावले आहेत. यात आता सार्वजनिक आरोग्य विभागानेही पुढाकार दाखवीत उपसंचालकस्तरावर वैद्यकीय चमू तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नागपूर आरोग्य विभागाचे उपसंचालक यांनी ३६ जणांची वैद्यकीय चमू तयार केली आहे. यात डॉक्टरांसह परिचारिका, तंत्रज्ञ व अटेंडंट आदींचा समावेश आहे. डॉक्टरांमध्ये फिजिशियन, शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तत्ज्ञ, बालरोग तज्ज्ञाचा समावेश आहे. केरळला रवाना होण्यासाठी ही चमू पुढील आदेशाची वाट पाहत आहे. विशेष म्हणजे, नागपुरातील डॉक्टरांच्या चमूने यापूर्वी नेपाळमधील भूकंपग्रस्तांना वैद्यकीयसेवा दिली आहे.
वैद्यकीय चमूत १७ डॉक्टर
संचालनालयाच्या सूचनेवरून केरळ येथे आरोग्यसेवा देण्यासाठी ३६ जणांची चमू तयार करण्यात आली आहे. यात १७ डॉक्टरांसह परिचारिका, तंत्रज्ञ व अटेंडंटचा समावेश आहे. निर्देश येताच ही चमू केरळकडे रवाना होईल.
डॉ. संजय जयस्वाल
उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर मंडळ