‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’ साठी लागणार ३,५०० कोटी
By Admin | Updated: April 4, 2017 01:56 IST2017-04-04T01:56:24+5:302017-04-04T01:56:24+5:30
वाठोडा येथील प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठ व व्यवस्थापन केंद्राचे प्रथम टप्प्याचे काम २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’ साठी लागणार ३,५०० कोटी
मनपाच्या प्रकल्पांचा आढावा : प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
नागपूर : वाठोडा येथील प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठ व व्यवस्थापन केंद्राचे प्रथम टप्प्याचे काम २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच सोमलवाडा व खामला येथे उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पावर ३,५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास महापालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, अशी माहिती सोमवारी महापालिकेच्या प्र्रकल्प आढावा बैठकीत देण्यात आली.
महापालिकेच्या प्रगतिपथावरील प्रकल्पांची कामे जलदगतीने करा, यात कुठलीही दिरंगाई चालणार नाही, असा इशारा महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाला दिला. यावेळी माजी महापौर प्रवीण दटके, अप्पर आयुक्त आर. झेड. सिद्दीकी, मुख्य अभियंता उल्हास देबडवार आदी उपस्थित होते.
२०१२-१३ च्या अर्थसंकल्पातील प्रस्तावित व सभागृहाने मान्यता दिलेल्या प्रकल्पात क्वेटा कॉलनी येथील अत्याधुनिक हॉस्पिटलचे निर्माण, रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृह, महाल व सक्करदरा येथील बुधवार बाजारांचा विकास करणे, सोख्ता भवन व्यापारी संकुलाचे बांधकाम,
वाठोडा येथे क्रीडा संकुलाची निर्मिती, अंबाझरी उद्यान आदींचा समावेश होता. या प्रकल्पांचा जिचकार यांनी आढावा घेतला. अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद स्मारक लवकरच रामकृष्ण मिशन यांच्याकडे हस्तांतरित करणार असल्याची माहितीही कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी दिली. घनकचरा व्यवस्थापन, जलमल शुद्धीकरण करण्याची कामे, जिंजर मॉल, दानागंज बीओटी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. शहरातील विविध मार्गावर १,२६,००० एलईडी पथदिवे बसविण्याचे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यातून ७५ कोटींची बचत अपेक्षित आहे. प्रगतिपथावरील सर्व प्रकल्पांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लवकरच भेट देणार असल्याची माहिती जिचकार यांनी यावेळी दिली. तसेच शहरातील प्रकल्पांसंदर्भात मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच आढावा बैठक घेणार आहेत. यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश जिचकार यांनी यावेळी दिले.(प्रतिनिधी)
कस्तूरचंद पार्क वर झेंडा उभारणार
कस्तूरचंद पार्क येथे महापालिका व ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील सर्वात उंच तिरंगा झेंडा उभारला जाणार आहे. या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यावर अंदाजे खर्च २.५० कोटी अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या निविदा तयार करण्यात आलेल्या आहेत. हा प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.