नागपुरात दक्षिण एक्स्प्रेसमधून ३.५० लाखाचे बनावट दागिने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 11:29 PM2018-09-15T23:29:18+5:302018-09-15T23:30:57+5:30

दक्षिण एक्स्प्रेसमधून बनावट दागिने आणि महागड्या दगडांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहाथ अटक केली आहे.

3.50 lakhs of fake jewelery seized at Nagpur in South Express | नागपुरात दक्षिण एक्स्प्रेसमधून ३.५० लाखाचे बनावट दागिने जप्त

नागपुरात दक्षिण एक्स्प्रेसमधून ३.५० लाखाचे बनावट दागिने जप्त

Next
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण एक्स्प्रेसमधून बनावट दागिने आणि महागड्या दगडांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहाथ अटक केली आहे.
मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी गठित केलेल्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक शिवराम सिंह, विजय पाटील, डी. डी. वानखेडे, किशोर चौधरी, नीळकंठ गोरे यांनी प्लॅटफार्म क्रमांक १ वर उभ्या असलेल्या १२७२१ दक्षिण एक्स्प्रेसच्या कोच एस-२ मध्ये ६६, ६७ बर्थवर २ व्यक्ती बसलेले दिसले. शंकेच्या आधारे त्यांना विचारणा केली असता त्यांनी आपले नाव मनोज, किशन लाल रा. जयपूर सांगितले. त्यांच्या जवळील बॅगबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात बनावट दागिने, दागिन्यात वापरावयाचे महागडे दगड किंमत ३.५० लाख आढळले. आरोपींना मुद्देमालासह आयकर विभागाच्या सुपूर्द करण्यात आले आहे.

१७ किलो गांजा पकडला
रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने दक्षिण एक्स्प्रेसने होत असलेली १७ किलो गांजाची तस्करी पकडून दोन आरोपींना रंगेहात अटक केली आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी गठित केलेल्या गुन्हे शाखेच्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक शिवराम सिंह, दीपक वानखेडे, विजय पाटील, किशोर चौधरी हे शनिवारी सकाळी ९.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक १ वर उभ्या असलेल्या १२७२१ दक्षिण एक्स्प्रेसच्या जनरल कोचची तपासणी करीत होते. त्यांना एक महिला आणि पुरुष संशयास्पद स्थितीत बसलेले आढळले. त्यांनी आपले नाव संतोष होतमसिंह परमार (२२) रा. धौलपूर राजस्थान आणि रोशनीदेवी प्रदीप कुमार (३०) रा. आग्रा उत्तर प्रदेश सांगितले. त्यांच्याजवळील बॅगची तपासणी श्वान रेक्सद्वारे केली असता श्वानाने त्यात मादक पदार्थ असल्याचा संकेत दिला. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. आरोपींजवळील बॅगमध्ये १ लाख ७० हजार रुपये किमतीचा १७ किलो ३०० ग्रॅम गांजा आढळला. जप्त केलेला गांजा आणि आरोपींना लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.

२०० दारूच्या बॉटल्सही जप्त
रेल्वे सुरक्षा दलाचा जवान विकास शर्मा हा प्लॅटफार्म क्रमांक २ वर गस्त घालत असताना दक्षिण एक्स्प्रेसमध्ये एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळला. त्याने आपले नाव सुमित सुकदेव येसनसुरे (२२) रा. रवींद्रनगर वॉर्ड, बल्लारशा सांगितले. त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या २,७४७ रुपये किमतीच्या १०२ बॉटल्स आढळल्या. दुसऱ्या घटनेत विकास शर्मा यास सायंकाळी ५.३० वाजता दक्षिण एक्स्प्रेसमध्ये एक व्यक्ती संशयास्पदरीत्या आढळला. त्याने आपले नाव गौतम देवानंद लोणारे (२३) महाराणा प्रताप वॉर्ड, बल्लारशा सांगितले. त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता, त्यात दारूच्या २,६०० रुपये किमतीच्या १०१ बॉटल्स आढळल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आली.

 

Web Title: 3.50 lakhs of fake jewelery seized at Nagpur in South Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.