शून्य ते १२ वर्षांखालील ३५ मुले पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:54+5:302021-04-04T04:08:54+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे व मुंबई या भागात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे बोलले ...

शून्य ते १२ वर्षांखालील ३५ मुले पॉझिटिव्ह
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे व मुंबई या भागात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे बोलले जात आहे. परंतु नागपूर जिल्ह्यात तूर्तास तरी असे काही चित्र नाही. जानेवारी ते मार्च या कालावधीत मेयो, मेडिकलमध्ये शून्य ते १२ वर्षाखालील ३५ मुले पॉझिटिव्ह आली. यातील १० ‘न्यू बॉर्न’ आहेत. तूर्तास एकाही मृत्यूची नोंद नाही.
नागपूर जिल्ह्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोना संसर्गाची ही दुसरी लाट असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. शिवाय, ‘कोविड-१९’ विषाणूमध्ये दोन म्युटेशन (बदल) झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने मान्य केले आहे. तज्ज्ञाच्या मते, पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत संसर्ग पसरण्याचा वेग जास्त असतो. यामुळे कुटुंबचे कुटुंब कोरोनाग्रस्त होत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५० वर्षांवरील रुग्णांची व त्यांच्यात मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे. त्या तुलनेत ० ते १२ वर्षांखालील रुग्णांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत मेडिकलमध्ये ५ ‘न्यू बॉर्न’ व २५ मुले तर, मेयोमध्ये २ ‘न्यू बॉर्न’ व ५ पॉझिटिव्ह मुलांची नोंद झाली.
-राज्यात महिन्याभरात वाढली १५,१९७ कोरोनाग्रस्त मुले
राज्यात १ मार्चला शून्य ते १० वयोगटातील ७१,९०८ मुले कोरोनाबाधित होती. ३१ मार्चला ती वाढून ८७,१०५ झाली. महिन्याभरात कोरोनाग्रस्त लहान मुलांची संख्या १५,१९७ ने वाढली.
-नागपुरात संसर्गाचे प्रमाण कमी
मेडिकलच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. दीप्ती जैन व मेयोच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सी. एम. बोकडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, पुणे, मुंबईच्या तुलनेत आपल्याकडे लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण फारच कमी आहे. शिवाय, पॉझिटिव्ह मातेकडूनही जन्माला आलेल्या नवजात अर्भकांमध्ये संसर्गाचे प्रमाणही कमी आहे.
-गंभीर लक्षणे नाहीत
डॉ. बोकडे यांनी सांगितले, जी लहान मुले पॉझिटिव्ह आली त्यांच्यातील अनेकांना लक्षणे नव्हती. काहींना सौम्य लक्षणे होती. सध्यातरी एकही कोविड पॉझिटिव्ह बाळ दगावल्याची नोंद नाही.
-मागील वर्षी ७ मृत्यू
आरोग्य विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार मार्च ते ऑक्टोबर २०२० पर्यंत,म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेत शून्य ते १५ वर्षांखालील ५६९२ मुले कोरोनाग्रस्त असल्याची नोंद झाली. यातील ७ बालकांचा मृत्यू झाला होता.