मेडिकलचे ३३ शिक्षक अतिरिक्त!
By Admin | Updated: December 5, 2014 00:37 IST2014-12-05T00:37:26+5:302014-12-05T00:37:26+5:30
गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आठ वर्षांपासून रखडलेले मेडिकल कॉलेज लवकरच लोकांच्या सेवेत असणार आहे. हे कॉलेज सुरू करण्याकरिता नागपुरातील मेडिकल

मेडिकलचे ३३ शिक्षक अतिरिक्त!
अनेक जण स्वेच्छानिवृत्तीच्या विचारात : मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी
नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आठ वर्षांपासून रखडलेले मेडिकल कॉलेज लवकरच लोकांच्या सेवेत असणार आहे. हे कॉलेज सुरू करण्याकरिता नागपुरातील मेडिकल कॉलेजमधील ३३ शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आल्याची माहिती आहे. यांची बदली गोंदिया मेडिकलमध्ये करण्याच्या प्रयत्नाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालण्याच्या मागणीला जोर पकडला आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे ओएसडी राव यांनी गुरुवारी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. प्रत्येक विभाग प्रमुखाला विभागात अतिरिक्त असलेल्या एक किंवा दोन शिक्षकांची नावे मागितली. त्यानंतर तयार झालेल्या यादीतील शिक्षकांची बैठक घेऊन त्यांच्याकडून तसे लेखी स्वरूपात लिहून घेतले. या शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या यादीत विभाग प्रमुखांची मर्जी चालल्याचे बोलले जात आहे. यातील काही शिक्षक स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या विचारात असून काही मुख्यमंत्र्याकडे हे प्रकरण मांडण्याच्या तयारीत आहे. नागपूरच्या मेडिकल, मेयोसह महाराष्ट्रात सध्या १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालये आहेत.
राज्य शासनाने विदर्भात गोंदिया, चंद्रपूरसह इतरत्र पाच नवे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली. त्यानुसार गोंदिया मेडिकल कॉलेजचे काम पूर्णत्वास आले असून मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) निकषाप्रमाणे पदे भरती करणे आवश्यक होते. परंतु वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) तसे न करता गोंदिया मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठात्याची जबाबदारी मेयोच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. केवलिया यांच्याकडे देत उर्वरित ३३ शिक्षक मेडिकलमधून पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, अधिष्ठाता सोडल्यास इतर सर्व शिक्षकांचे वेतन मेडिकलमधूनच निघणार आहे. ही बदली एमसीआयच्या निरीक्षणाकरीता तात्पुरत्या स्वरूपातील आहे, असे राव यांचे म्हणणे आहे.
मात्र, सूत्रानुसार बदलीच्या ठिकाणी संबंधित शिक्षकांना जावेच लागणार आहे. परिणामी अनेक जण स्वेच्छानिवृत्तीच्या विचारात आहे, असे झाल्यास शिक्षकांच्या तुटवड्याने समस्येच्या विळख्यात सापडलेल्या डीएमईआर विभागाला चांगलाच धक्का बसणार आहे. (प्रतिनिधी)