नागपुरातील तब्बल ३२० इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:01 PM2019-08-01T12:01:43+5:302019-08-01T12:04:45+5:30

नागपूर महापालिकेतर्फे झोन स्तरावर करण्यात आलेल्या सर्वेच्या आधारावर शहरात ३२० इमारती असुरक्षित व जीर्ण झालेल्या आहेत. यापैकी १८३ इमारतींचा आजही उपयोग होत आहे.

320 buildings in Nagpur are old and dangerous | नागपुरातील तब्बल ३२० इमारती धोकादायक

नागपुरातील तब्बल ३२० इमारती धोकादायक

Next
ठळक मुद्देमनपाचे दुर्लक्ष मोठी दुर्घटना होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेतर्फे झोन स्तरावर करण्यात आलेल्या सर्वेच्या आधारावर शहरात ३२० इमारती असुरक्षित व जीर्ण झालेल्या आहेत. यापैकी १८३ इमारतींचा आजही उपयोग होत आहे. ९८ इमारती पाडण्यात आल्या आहेत. ३६ इमारतीमध्ये राहणाऱ्यांनी देखभाल दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. इतवारी, गांधीबाग, महालसारख्या जुन्या वस्त्यांमध्ये सर्वाधिक १०५ जीर्ण इमारती आहेत. त्यांना नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. त्या कधीही पडण्याच्या स्थितीत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
पावसाळा म्हटला की, जीर्ण इमारतींचा मुद्दा ऐरणीवर येतो. या काळात एखादा मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील जीर्ण इमारतींचा विचार केला असता शहरात एकूण ३२० इमारती जीर्ण आहेत. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
नागपूर शहरात २० हजार इमारती ३० वर्षावरील आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार ३० वर्षावरील इमारतींचे ऑडिट करणे महापालिकेला बंधनकारक आहे. मात्र या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. ६० वर्षावरील इमारतींची संख्या हजाराहून अधिक आहे. यातील ३३० इमारती अती जीर्ण झालेल्या आहेत. त्या कुठल्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. कायद्यानुसार महापालिकेने किमान अशा जीर्ण इमारतींचे ऑडिट करणे आवश्यक असून यासाठी झोनच्या सहायक आयुक्तांवर याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. झोन अधिकाऱ्यांनी अशा इमारतींचा सर्वे करून संबंधितांना नोटीस बजावण्याची गरज आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. महापालिकेने गत काळात तज्ज्ञांचे पॅनल नियुक्त केले होते. मात्र इमारत मालक त्यांच्याकडे फिरकत नाही. तसेच आजूबाजूचे नागरिकही जीर्ण इमारतीकडे दुर्लक्ष करतात. जीर्ण इमारतीचे दरवर्षी ऑडिट होण्याची गरज आहे. अन्यथा मोठा अपघात होण्याचा धोका आहे.

३१७ जणांना नोटीस
जीर्ण इमारत पाडण्यासंदर्भात झोन अधिकाऱ्यांनी शहरातील ३१७ लोकांना नोटीस बजावलेल्या आहेत. मात्र याची इमारत मालक दखल घेत नाही. मागील काही वर्षात ९८ जीर्ण इमारती पाडण्यात आल्या. परंतु ही कारवाई पुरेशी नाही. याची गती वाढविण्याची गरज आहे.

गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक १०५ इमारती धोकादायक
शहरातील धोकादायक इमारतींचा झोननिहाय विचार केल्यास सर्वाधिक १०५ धोकादायक इमारती गांधीबाग झोनमध्ये आहेत. त्यानंतर नेहरूनगर झोनमध्ये ७०, मंगळवारी झोनमध्ये ४०, लक्ष्मीनगर झोनमध्ये ३२, धंतोली व धरमपेठ झोनमध्ये प्र्रत्येकी २१, सतरंजीपुरा झोनमध्ये १५, हनुमाननगर झोन ९, लकडगंज चार आणि आशिनगर झोनमध्ये ३ धोकादायक इमारती आहेत.

एक सिस्टीम तयार व्हावी
शहरात किती इमारती धोकादायक आहेत याचा सर्वे करून एक यादी तयार व्हावी. त्यांना नोटीस पाठवून कारवाई व्हावी. मनपातर्फे हे केले जाते, परंतु त्यात गांभीर्य दिसून येत नाही. यात त्यांच्याही मर्यादा आहेत. कारण लोकांमध्येसुद्धा जागृतीचा अभाव आहे. मनपा कारवाई करते ते लोकांच्या हितासाठीच. परंतु कुणी ऐकत नाही. तेव्हा लोकजागृतीची सुद्धा आवश्यकता आहे. नवीन बांधकामास मंजुरी देतानाच भविष्याच्या विचाराचे नियोजन व्हावे. एकूणच यासंदर्भात एक सिस्टीम तयार करण्याची गरज आहे.
- विजय सालनकर, वरिष्ठ आर्किटेक्ट

Web Title: 320 buildings in Nagpur are old and dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.