पेंच प्रकल्पासाठी ३०० कोटी

By Admin | Updated: March 2, 2016 03:11 IST2016-03-02T03:11:14+5:302016-03-02T03:11:14+5:30

पेंच प्रकल्प व कन्हान बॅरेज कोच्छी प्रकल्प हे नागपूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे प्रकल्प आहेत.

300 Crore for screw project | पेंच प्रकल्पासाठी ३०० कोटी

पेंच प्रकल्पासाठी ३०० कोटी

मंत्रिमंडळाचा निर्णय : पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार
नागपूर : पेंच प्रकल्प व कन्हान बॅरेज कोच्छी प्रकल्प हे नागपूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे प्रकल्प आहेत. नागपूर शहराचा होत असलेला विकास व भविष्यातील शहराची पाण्याची गरज विचारात घेता पेंच प्रकल्पासाठी तीन वर्षात ३०० कोटींची तरतूद करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पेंच प्रकल्प व कन्हान बॅरेज कोच्छी प्रकल्पाकडे मंत्रिमंडळाचे लक्ष वेधले होते.
शहर व जिल्ह्याचा विकास होत आहे. नवीन मोठमोठे प्रकल्प उभे राहात आहेत. या सोबतच शहराची लोकसंख्या वाढत असल्याने भविष्यात पिण्याचे पाणी, औद्योगिक क्षेत्र व शेतीसाठी पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
पेंच प्रकल्पासाठी ३०० कोटी तर कोच्छी प्रकल्पासाठी १७० कोटींचा निधी मिळणार असल्याने या प्रकल्पातील विविध प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण होतील. बॅरेजच्या उजव्या बाजूकडील उर्ध्व आणि निम्न भागातील गार्डवाल, डिवाइड वाल आणि किवाल याचे काम पूर्ण झाले आहे. बॅरेजच्या १६ ब्लागपैकी ६ ब्लॉगचे ८० टक्के काम करण्यात आले आहे उभ्या पद्धतीच्या १६ दरवाजाचे फेब्रिकेशनचे काम पूर्ण झाले आहे. बॅरेजचे पुढील काम मार्गी लागण्यासाठी निधीची गरज होती. यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे शहर व जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यात वाढ होईल. तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्याला मदत होणार आहे. (प्रतिनिधी)

कोच्छी प्रकल्पासाठी १७० कोटी
सावनेर तालुक्यातील कन्हान नदीवर बॅरेज कोच्छी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे सावनेर तालुक्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहीत करण्यासाठी १७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे सावनेर तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कन्हान नदी मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येताना या नदीवर कोणत्याही स्वरुपाचा बंधारा नाही. त्यामुळे कोच्छी प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा होणार आहे.

शहर व जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सुटेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेंच प्रकल्पासाठी ३०० कोटी तर कोच्छी प्रकल्पासाठी १७० कोटी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहर व जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटेल. भविष्यातही पाण्याची अडचण जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तसेच शहरात उभ्या राहात असलेल्या मोठ्या प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या बाबत शहरातील जनतेच्यावतीने त्यांचे स्वागत करतो.
प्रवीण दटके, महापौर

Web Title: 300 Crore for screw project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.