नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये ३०० वर ‘बेरियाट्रिक सर्जरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:46 AM2018-02-14T10:46:49+5:302018-02-14T10:49:50+5:30

आतापर्यंत नागपूर मेयो व मेडिकलमध्ये ३०० वर बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ही संख्याही इतर शासकीय रुग्णालाच्या तुलनेत सर्वाधिक ठरली आहे.

300 'Bariatric Surgeries' in Medical and mayo hospitals in Nagpur | नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये ३०० वर ‘बेरियाट्रिक सर्जरी’

नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये ३०० वर ‘बेरियाट्रिक सर्जरी’

Next
ठळक मुद्देडॉ. राज गजभिये यांचा पुढाकारश्रीमंतच नव्हे तर गरिबांचीही लठ्ठपणातून सुटका

सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लठ्ठपणा म्हणजे ‘ओबेसिटी’ ही स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत सर्वामध्ये आढळतो. भारत हा ओबेसिटी या लठ्ठपणाशी संबंधित आजारात जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि ओबेसिटी हा एक आजार आहे, हे लोकांना माहीतच नाही. परिणामी त्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात आणि मृत्यूला सामोरे जातात. याची दखल प्रसिद्ध शल्यचिकित्सक व सध्याचे मेडिकल शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांनी घेऊन २०११ मध्ये मेयो रुग्णालयात पहिली बेरियाट्रिक शस्त्रक्रिया केली. राज्यातील नव्हे तर देशातील शासकीय रुग्णालयात केलेली ही पहिली शस्त्रक्रिया ठरली. त्यांच्या नेतृत्वात आतापर्यंत मेयो व मेडिकलमध्ये ३०० वर बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ही संख्याही इतर शासकीय रुग्णालाच्या तुलनेत सर्वाधिक ठरली आहे.
भारतात जंक फूड, अल्कोहोलचे वाढते प्रमाण व अयोग्य जीवनशैलीमुळे पाचपैकी एक पुरुष किंवा स्त्री लठ्ठपणाने ग्रस्त आहे. वजन जास्त असल्यामुळे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, आर्थ्रायटिस, कर्करोग, अ‍ॅथरोस्केरासिस असे आजार होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) २.८ दशलक्ष प्रौढ व्यक्ती या फक्त लठ्ठपणाच्या कारणाने दरवर्षी मरण पावतात. ‘डब्ल्यूएचओ’नुसार ओबेसिटीमुळे ४४ टक्के लोक मधुमेहामुळे, २३ टक्के लोक हृदयरोगामुळे तर ७.४१ टक्के लोक कर्करोगाला बळी पडतात. मेयो, मेडिकल रोजच्या ओपीडीमध्ये साधारण पाच रुग्ण ओबेसिटीचे येतात. यातील एका रुग्णाला बेरियाट्रिक शस्त्रक्रियेची गरज पडते. याची दखल त्यावेळी मेयोच्या शल्यक्रियाविभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांनी घेऊन २०११ मध्ये पहिली बेरियाट्रिक शस्त्रक्रिया केली. गेल्या दोन वर्षांपासून डॉ. गजभिये मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी येथेही या शस्त्रक्रिया सुरू केल्या आहेत. मेयो व मेडिकलमध्ये आतापर्यंत त्यांनी २५० ते ३०० वर बेरियाट्रिक शस्त्रक्रिया केल्या आहेत.

१८७ किलो वजनाच्या पुरुषावर यशस्वी शस्त्रक्रिया
मेडिकलमध्ये शेकडो बेरियाट्रिक सर्जरी झाल्या असल्यातरी यात सर्वाधिक वजनाच्या म्हणजे १८७ किलो वजनाच्या पुरुषावर झालेली यशस्वी बेरियाट्रिक सर्जरी महत्त्वाची ठरली. आज या पुरुषाचे वजन ८२ किलो झाले असून या शस्त्रक्रियेमुळे तब्बल १०५ किलो वजन कमी झाले आहे. ते आता सामान्य जीवन जगत असल्याचे डॉ. गजभिये यांनी सांगितले.

मुख्यमंत्री साहाय्यता निधीची मदत
मेडिकलमध्ये उपचार घेणाऱ्यांमध्ये गरीब रुग्णांची संख्या मोठी आहे. यात लठ्ठपणा असलेल्या रुग्णांची संख्या कमी असली तरी दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. अशा रुग्णांमध्ये मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, आर्थ्रायटिस असल्याने मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी बेरियाट्रिक सर्जरी हाच एकमेव उपचार ठरतो. परंतु खासगीमध्ये काही लाख रुपयांमध्ये ही शस्त्रक्रिया होते. यामुळे गरीब व सामान्य रुग्ण मोठ्या आशेने मेडिकलमध्ये येतात. यात मुख्यमंत्री सहायता निधीची मोठी मदत होत असल्याने याचा फायदा रुग्णांना होत आहे, असेही डॉ. गजभिये यांनी सांगितले.

डॉ. लकडवाला यांनी केली मेडिकलमध्ये शस्त्रक्रिया
अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सेस, डायबेटिक असोसिएशन आॅफ इंडिया व असोसिएशन आॅफ सर्जन्सच्या वतीने नुकतेच बेरियाट्रिक सर्जरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी व डॉ. राज गजभिये यांनी मिळून मेडिकलमध्ये एका १५७ किलो वजनाच्या व १४२ किलो वजनाच्या रुग्णावर ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. या दोन्ही शस्त्रक्रियेचे सभागृहात थेट प्रक्षेपण करून या दोन्ही तज्ज्ञानी उपस्थित शकेडो तज्ज्ञांना मार्गदर्शन केले. यामुळे मेडिकल केवळ बेरियाट्रिक शस्त्रक्रियेवरच भर देत नाही तर या क्षेत्रात तज्ज्ञ वाढविण्यावरही भर देत असल्याचे चित्र आहे.

Web Title: 300 'Bariatric Surgeries' in Medical and mayo hospitals in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.