अर्थसंकल्पाला ३० टक्के कात्री ?

By Admin | Updated: January 24, 2016 02:49 IST2016-01-24T02:49:27+5:302016-01-24T02:49:27+5:30

महापालिकेच्या २०१५-१६ या वर्षाच्या अर्थसंकल्पात १९४६. १६ कोटींचे उत्पन्न गृहित धरले होते.

30 percent of the budget cottage? | अर्थसंकल्पाला ३० टक्के कात्री ?

अर्थसंकल्पाला ३० टक्के कात्री ?

आयुक्तांचा सुधारित अर्थसंकल्प : बुधवारी स्थायी समितीला सादर करणार
नागपूर : महापालिकेच्या २०१५-१६ या वर्षाच्या अर्थसंकल्पात १९४६. १६ कोटींचे उत्पन्न गृहित धरले होते. परंतु गेल्या आठ महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेला महसूल व आर्थिक स्रोत विचारात घेता आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सुधारित अर्थसंकल्प तयार केला आहे. येत्या बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत तो सादर केला जाणार असून यात स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला ३० टक्के कात्री लागण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला सभागृहाने मंजुरी दिली होती. परंतु गेल्या आठ महिन्यातील महापालिकेचे उत्पन्न विचारात घेता आयुक्तांपुढे स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला कात्री लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आयुक्तांचा सुधारित अर्थसंकल्प १३०० ते १३५० कोटींच्या आसपास राहणार आहे.
राज्य सरकारने १ आॅगस्ट २०१५ पासून एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला. या मोबदल्यात सुरुवातीला महापालिकेला दर महिन्याला ३२ कोटींचे अनुदान मिळत होते. नंतर त्यात वाढ करुन ते ५० कोटीपर्यत वाढविले आहे. त्यामुळे मार्चपर्यंत एलबीटीपासून अपेक्षित ४५० कोटीचे उत्पन्न होण्यात कोणतीही अडचण दिसत नाही.
परंतु मालमत्ता कर, पाणीपुरवठा, नगररचना विभागाकडून अपेक्षित उत्पन्न तसेच शासनाकडून गृहीत धरलेले अनुदान मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला कात्री लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
इतर बाबीपासून अपेक्षित असलेले उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा होण्याची शक्यता कमीच आहे. याचा परिणाम सुधारित अर्थसंकल्पावर झाला आहे. स्थायी समितीने सादर केलेला अर्थसंकल्प व प्रत्यक्ष उत्पन्न यातील तफावत मागील तीन-चार वर्षात वाढली आहे. परिणामी मंजूर विकास कामांसाठी प्रशासनाकडून निधी उपलब्ध होण्याला विलंब लागत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

विकास कामावर परिणाम होणार नाही
मूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत आयुक्तांच्या सुधारित अर्थसंकल्पात तूट दर्शविण्यात येणार असली तरी स्थायी समितीने मंजूर केलेल्या शहर विकासाच्या कामावर याचा परिणाम होणार नाही. महापालिकेचे आर्थिक स्रोत विचारात घेऊ नच स्थायी समितीने अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे यात फारसा बदल अपेक्षित नाही.
रमेश सिंगारे, अध्यक्ष स्थायी समिती,महापालिका

Web Title: 30 percent of the budget cottage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.