निशांत वानखेडे
नागपूर : गेल्या शंभर वर्षात २०१६ हे सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून गणले जाते, कारण यावर्षी सरासरी तापमान १.२४ अंशाने वाढले हाेते. तसे मागील २०२२ यावर्षी सुद्धा उन्हाचे अत्याधिक चटके सहन करावे लागले. गेल्या वर्षी ५० वर्षांचा विक्रम माेडीत काढत विदर्भवासीयांनी ३० दिवस उष्णतेच्या लाटांचा सामना केला. यावर्षीही सूर्याचे चटके अधिक तीव्र राहतील,असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
जागतिक स्तरावर आणि भारतातही २०१० पासून सातत्याने तापमान वाढत आहे. २०१३ ते २०१६ या काळात उष्णतेने चांगलाच कहर केला हाेता. यापूर्वी विदर्भातून केवळ चंद्रपूर उष्णतेसाठी प्रसिद्ध हाेते, पण आता नागपूरसह सर्व शहरे उष्ण लाटांच्या प्रभावात आली आहेत. गेल्या वर्षी तर विदर्भातील पाच शहरे उष्णतेच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत पहिल्या १० शहरांमध्ये पाेहोचले हाेते. भंडारा आणि गाेंदिया ही शहरे सुद्धा उष्णतेच्या प्रभावात आले असून, तेथील पारा ४६ अंशापर्यंत पाेहोचत आहे. २०२२ मध्ये ‘अल-निनो’ च्या प्रभावामुळे पावसानेही कहर केला. यावर्षी वाढत चाललेला ‘अल-निनो’चा प्रभाव पाहता २०२३ हे वर्ष सुद्धा उष्ण लहरी आणि अतिशय तापमान वाढीचे राहील, असा अंदाज हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला.
२०२२ च्या ठळक नाेंदी
- ३० दिवस उष्ण लाटा. २९, ३०, ३१ मार्च, १ व २ एप्रिल, २६ ते ३० एप्रिल, ८ ते १५ मे आणि ३ ते ७ जून.
- ३१ मार्च तसेच १ व २ एप्रिलला ४४.६ अंशासह चंद्रपूर जगात टाॅपवर.
- जागतिक क्रमवारीत चंद्रपूरसह नागपूर, अकाेला, वर्धा व ब्रम्हपुरी ही शहरे पहिल्या १० मध्ये.
- २९ व ३० एप्रिलला चंद्रपूर ४६.४ व ४६.६ अंश, महाराष्ट्रात सर्वाधिक. नागपूर ४६ अंशावर.
दाेन दशकातील ठळक नाेंदी
- १९ जून २०१५ ला नागपूर ४८ अंशावर. आतापर्यंत सर्वाधिक
- चंद्रपूरला १२ जून २००७ राेजी ४९ अंश (सर्वाधिक). २ मे २००४ ला ४८.३ अंश आणि २३ मे २०१३ राेजी ४८.९ अंश.
- देशात १९ मे २०१९ राेजी राजस्थानच्या पाळाेधी येथे आतापर्यंतचे सर्वाधिक ५१ अंश तापमान. याच वर्षी चुरू येथे ५० अंश.
ऐतिहासिक तापमान वाढ
- १८५० ते १९५० या औद्योगिक काळापूर्वीचे तापमान पाहता सन २००० नंतर विक्रमी तापमान वाढ.
- २००० मध्ये ०.६७ अंश, २००५ मध्ये ०.९१ अंश, २०१० मध्ये ०.९७ अंश व २०१४ मध्ये सरासरी १ अंशाची वाढ.
- २०१४ नंतर प्रत्येक वर्षी सरासरी १ डिग्रीच्यावर.
- २०१६ मध्ये सरासरी १.२८ डिग्रीने वाढले.
वाढलेले औद्याेगिकरण, शहरीकरण, जंगलतोड, प्रदूषण आणि विशेषत: वातावरणातील कार्बनवायूचे प्रमाण (४२० पीपीएम) हे जागतिक पातळीवर तापमान आणि उष्ण लहरीस कारणीभूत आहेत. यावर्षी ‘अल-निनाे’सुद्धा प्रभावित करण्याची शक्यता आहे. तापमान वाढीत विदर्भासाठी धाेक्याचे संकेत मिळत आहेत.
- प्रा. सुरेश चाेपणे, सदस्य, इंडियन सायन्स काँग्रेस