३० मिनिटात ३ टोलनाके लुटले

By Admin | Updated: October 26, 2016 03:10 IST2016-10-26T03:10:35+5:302016-10-26T03:10:35+5:30

वाडी मार्गावर हैदोस घालत अवघ्या ३० मिनिटात ३ टोलनाके लुटणाऱ्या तीन लुटारुंच्या वाडी पोलिसांनी घटनेच्या तासाभरातच मुसक्या बांधल्या.

3 tolnas robbed in 30 minutes | ३० मिनिटात ३ टोलनाके लुटले

३० मिनिटात ३ टोलनाके लुटले

वाडी-एमआयडीसीत लुटारुंचा हैदोस : तासाभरात पोलिसांनी बांधल्या मुसक्या
नागपूर : वाडी मार्गावर हैदोस घालत अवघ्या ३० मिनिटात ३ टोलनाके लुटणाऱ्या तीन लुटारुंच्या वाडी पोलिसांनी घटनेच्या तासाभरातच मुसक्या बांधल्या. प्रिन्स वीरेंद्र सिंग (वय ३०, रा. खडगाव रोड), मोहित पुरुषोत्तम कोठे (वय २०, रा. दत्तवाडी, गजानननगर सोसायटी) आणि सागर संजय मेश्राम (वय २७, रा. हरिओम सोसायटी) अशी या लुटारुंची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वॅगनआर कार (एमएच ४०/ एआर ०१९१) आणि लुटलेली रक्कम जप्त केली.
आरोपी प्रिन्स ट्रकचालक आहे. मोहित एका कंपनीत काम करतो. तर, सागर कारपेंटर आहे.
हे तिघे सोमवारी रात्रभर दारू पीत होते. मंगळवारी पहाटे २.४० वाजता ते कारमधून दाभा टोल नाक्यावर बूथ क्रमांक एकवर पोहचले. तेथे रोखपाल जितेंद्र केशवराव पाटील (वय ३२, रा. दत्तवाडी) याला मारहाण करीत त्यांनी ४३५० रुपये लुटले. तेथून ते वाडी एमआयडीसीत मार्गावरील टोलनाक्यावर पोहचले. येथे चेतन अशोकराव कारेमोरे (वय १९) या रोखपालाला मारहाण करून धमकी देत ५०० रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर त्यांनी पहाटे ३ च्या सुमारास बाजूच्या टोलनाक्यावरील (बी-१) कॅश काऊंटर लुटले. येथून ४०५५ रुपये लुटून त्यांनी गौरख हिंमत कोळी (वय २५) याला जिवे मारण्याची धमकी दिली अन् पळ काढला. अवघ्या ३० मिनिटात तीन टोलनाक्यावर लुटमार करण्याच्या घटना घडल्याचे नियंत्रण कक्षात कळाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली.
नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी ही बाब वाडी पोलिसांना कळविली. यावेळी ठाणेदार भीमराव खंदाळे रात्रगस्तीवर होते. त्यांनी लगेच लुटारुंच्या कारचा नंबर घेत परिसरात शोधाशोध सुरू केली. नमूद वर्णनाची कार खडगांव वळणावरून वाडी अमरावती रोडने जात असल्याचे दिसताच त्यांनी तात्काळ वाडी पोलीस ठाण्यात संबंधित मार्गावर नाकाबंदी करण्याच्या सूचना देत पाठलाग सुरू केला. समोर आणि मागे पोलीस दिसल्याने लुटारूंनी आपली कार थांबवली अन् त्यांना पहाटे ३.२० च्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

धोक्याचा पाठलाग, कौतुकाची थाप
ठाणेदार खंदाळे तसेच वाहनचालक अरुण इंगळे यांनी धोका पत्करून आरोपीच्या वाहनाचा पाठलाग केला. त्याचमुळे वेगात पळून जाणारे पहिले दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लुटलेली रक्कम आणि कार जप्त करण्यात आली. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनी ठाणेदार भीमराव खंदाळे, सहायक निरीक्षक आर.एल. शिंदे, हवालदार शंकर शुक्ला, अजय पाटील, नायक अरुण इंगळे (चालक), शिपाई जितेंद्र दुबे, विजय मिश्रा, रंजित धनेकर यांचे कौतुक करून त्यांना रोख पुरस्कार जाहीर केला.

Web Title: 3 tolnas robbed in 30 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.