१७ तासात ३ खून

By Admin | Updated: May 26, 2015 02:31 IST2015-05-26T02:31:25+5:302015-05-26T02:31:25+5:30

रविवार रात्री ८ ते सोमवार दुपारी १ या १७ तासात उपराजधानीत खुनाच्या ३ घटना घडल्या तर, एकाचा खून करण्याचा

3 hours in 17 hours | १७ तासात ३ खून

१७ तासात ३ खून

गुन्हेगार शिरजोर : पोलीस हतबल : रस्त्यावर खुनाचा सडा
नागपूर :
रविवार रात्री ८ ते सोमवार दुपारी १ या १७ तासात उपराजधानीत खुनाच्या ३ घटना घडल्या तर, एकाचा खून करण्याचा प्रयत्न झाला. या घटनांमुळे उपराजधानीतील गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढल्याचे उघड झाले. हतबल पोलिसांमुळे उपराजधानीच्या रस्त्यावर खुनाचा सडा पडत आहे.

नातेवाईक उठला जीवावर
सक्करदऱ्यात सय्यद सलीम सय्यद खलील (वय ३४) या वाहनचालकाचा सोमवारी ८ च्या सुमारास भीषण खून झाला. शेख मुबारक शेख हयात (वय २५) या आरोपीसोबत सलीमचा वाद होता. एक मिनार मशीदजवळच्या बरेली शरीफ किराणा स्टोर्सजवळ सोमवारी रात्री सलीम बसून होता. आरोपी मुबारक शेख आपल्या साथीदारांसह तेथे आला. मुबारकने सलीमच्या मानेवर, गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याला घटनास्थळीच ठार मारले. सक्करदरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. काही वेळेतच आरोपी मुबारक पोलिसांच्या हाती लागला. त्याला अटक करून त्याचा आज कोर्टातून २८ मेपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला.

व्यसनाने केला घात
खुनाची तिसरी घटना नंदनवनमधीलच डायमंडनगरात सोमवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. संदीप जागेश्वर चौधरी (वय ३२) हा पेंटिंगचे काम करायचा. त्याला दारूचे भारी व्यसन होते. त्यामुळे तो अनेकदा कामावरही जात नव्हता.
संदीपची सुरेश मंचलवारसोबत मैत्री होती. ते नेहमीच संदीपच्या घरात बसून दारू प्यायचे. सोमवारी सकाळी ११.३० ला ते नेहमीप्रमाने संदीपच्या घरात दारू पीत बसले. यावेळी आरोपी सुरेशने संदीपला शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे संदीपची पत्नी कल्पना हिने दोघांनाही फटकारले. भांडण करायचे असेल तर यापुढे घरात यायचे नाही, अशीही ताकीद दिली.
त्यानंतर ती धुण्याभांडीच्या कामाला निघून गेली. दुपारी १.३० वाजता ती परत आली. त्यावेळी मुले आनंद (वय ५ वर्षे) आणि श्रावणी (वय दीड वर्षे) अंगणात खेळत होते. दाराची कडी लावून होती. दार उघडताच घरात संदीपचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. कल्पनाने आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. नंदनवन पोलिसांनाही सांगितले. पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. आरोपी मंचलवारने संदीपच्या छातीवर गुप्तीचे घाव घातल्यामुळे संदीपचा मृत्यू झाला. कल्पनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुरेश मंचलवारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.

नंदनवनमध्ये मित्राने केला घात

सक्करदऱ्यातील खुनाच्या घटनेची चर्चा गरम असतानाच अशोक तुळशीराम उंबरकर (वय २७) याचा आकाश मंडल (वय २२) आणि चेतन मंडल (वय २०) या दोन भावांनी निर्घृण खून केला.
मृत अशोक खरबीतील शक्तिमातानगरात राहत होता. तो तवेरावर चालक होता तर, आरोपी आकाश आणि त्याचा भाऊ चेतन मंडल हिवरी लेआऊटमध्ये जयभीम चौकाजवळ राहतात. ते कधी आॅटो तर कधी भाड्याचे वाहन चालवतात. तिघांनाही दारूचे व्यसन आहे. रविवारी मध्यरात्रीपर्यंत ते सोबत दारू पीत होते. त्यानंतर मंडल बंधूंना घरी सोडण्यासाठी अशोकने त्यांना स्वत:च्या मोटरसायकलवर बसवले. ते तिघे मंडलच्या घरासमोर आले. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. तो टोकाला गेला. अशोकने घाणेरड्या शिव्या दिल्यामुळे चिडलेल्या आरोपीने अशोकच्या डोक्यावर दगडाने ठेचले. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. काही वेळेतच अशोकचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह आणि त्याची मोटरसायकल सेंट झेव्हियर स्कूलसमोरच्या फुटपाथजवळ आणून टाकली. अपघात वाटावा म्हणून आरोपींनी अशोकच्या अंगावर मोटरसायकल टाकली आणि घरी गेले. तेथे त्यांनी रस्त्यावर पडलेल्या रक्ताचे थारोळे धुवून काढले. सकाळी ७ च्या सुमारास परिसरातील मंडळींना अशोकचा मृतदेह पडून दिसला. त्याचा अपघात झाला, अशी चर्चाही पसरली. माहिती मिळाल्यानंतर नंदनवनचा पोलीस ताफा धडकला. एकाने अशोकचा मृत्यू अपघात नसून खून आहे, अशी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपी मंडल बंधूंना अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: 3 hours in 17 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.